प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिक्षण संचालकांनी दिली १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 14:45 IST2025-03-26T14:45:17+5:302025-03-26T14:45:47+5:30
राहिलेले प्रवेश हे १८ ते २४ मार्च या कालावधीत करण्याचे नियोजन

प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिक्षण संचालकांनी दिली १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत दुर्बल वंचित घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील पहिल्या प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालकांनी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता १ एप्रिल २०२५ पर्यंत पहिल्या प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांचे प्रवेश करता येणार आहेत. विनाअनुदानित खासगी शाळांमध्ये २५ टक्के वंचित व दुर्बल घटकातील मुलांना इयत्ता पहिलीसाठी ऑनलाइन मोफत प्रवेश देण्यात येतात. या वर्षीची प्रवेशप्रक्रिया ही सुरू आहे. परंतु यामधील पहिल्या प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांचे राहिलेले प्रवेश हे १८ ते २४ मार्च या कालावधीत करण्याचे नियोजन प्राथमिक शिक्षण संचालनालयाने केले होते.
१,०१० अर्ज प्रलंबित
- या कालावधीतील पात्र अर्जदारांना मेसेज पाठवून प्रवेशासंदर्भात कळवण्यात येत आहे. मुंबई विभागात या कालावधीत एकूण ३२७ शाळांमध्ये १,२६० पात्र अर्जदार निवडले.
- त्यातील प्रत्यक्षात २४६ प्रवेश झाले. ४ अर्जदारांचे प्रवेश नाकारले तर १,०१० अर्ज प्रलंबित आहेत.
- आता याच प्रक्रियेची मुदत १ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण संचालक, प्राथमिक विभाग शरद गोसावी यांनी ‘लोकमत’ला दिली.