शिवाजी मंदिर नाट्यगृहाचा तिढा सुटणार तरी कधी?; निर्माते आणि नाट्यगृह प्रशासन आपापल्या भूमिकांवर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 09:44 AM2024-07-02T09:44:22+5:302024-07-02T09:45:32+5:30

पुढील किमान तीन महिने तरी या संस्था शिवाजी मंदिरमध्ये प्रयोग सादर करण्याची चिन्हे नाहीत.

The dispute between the Shree Shivaji Mandir theater and some theater producers that has been going on since December | शिवाजी मंदिर नाट्यगृहाचा तिढा सुटणार तरी कधी?; निर्माते आणि नाट्यगृह प्रशासन आपापल्या भूमिकांवर ठाम

शिवाजी मंदिर नाट्यगृहाचा तिढा सुटणार तरी कधी?; निर्माते आणि नाट्यगृह प्रशासन आपापल्या भूमिकांवर ठाम

मुंबई - श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह आणि काही नाट्य निर्मात्यांमध्ये डिसेंबरपासून सुरू असलेला वाद अद्याप शमलेला नाही. या वर्षातील तिसऱ्या तिमाहीतील तारखांच्या वाटपातही नाराज नाट्य निर्मात्यांनी सहभाग घेतला नाही. यामुळे पुढील तीन महिने दादरमधील नाट्य रसिकांना काही गाजलेली नाटके पाहण्यासाठी यशवंत नाट्य मंदिर आणि दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाकडे धाव घ्यावी लागणार आहे. 

१ जानेवारीपासून प्रशांत दामलेंची गौरी थिएटर, दिलीप जाधव यांची अष्टविनायक, संतोष शिदम यांची मल्हार, चंद्रकांत लोकरेंची एकदंत, विजय केंकरेंची प्रवेश, मिहीर गवळींची रॉयल थिएटर, निनाद कर्पेंची बदाम राजा प्रॉडक्शन, अजय कासुर्डेंची सरगम क्रिएशन, नंदू कदम यांची सोनल प्रॉडक्शन या निर्मिती संस्थांची नाटके झालेली नाहीत. 

पुढील किमान तीन महिने तरी या संस्था शिवाजी मंदिरमध्ये प्रयोग सादर करण्याची चिन्हे नाहीत. नाराज निर्मात्यांना चर्चेसाठी बोलावण्यात आल्याचे श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष मेजर सुधीर सावंत यांनी वारंवार सांगितले; पण शिवाजी मंदिर नाट्यगृहाच्या कारभारावर नाराज असलेल्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या दिलीप जाधव यांनी याबाबत स्पष्ट नकार दिला. ‘लोकमत’शी बोलताना दिलीप जाधव म्हणाले की, आम्हाला कोणीही चर्चेसाठी बोलावलेले नाही. शिवाजी मंदिरमध्ये प्रयोग न झाल्याने आमच्या नाटकांचे प्रयोग मुळीच थांबलेले नाहीत. तिथल्या असुविधांचा त्रास केवळ निर्मात्यांनाच होत नसून प्रेक्षकांनाही सहन करावा लागत आहे. 

पार्किंगच्या असुविधेसोबतच लिफ्टची सोय नाही. ‘वाडा चिरेबंदी’ आणि ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकांचे सेट्सही तिथे लावता येत नाहीत. असे असूनही ५०० रुपये तिकीट दर केल्यास नाट्यगृहाचे भाडे वाढवले जाते. यापेक्षा त्यांच्या अटींवर आम्हाला तिथे प्रयोगच करायचे नाहीत. त्यामुळे यापुढेही शिवाजीमध्ये तारखा घेणार नाही. 

आता यशवंत नाट्यमंदिर सुरू झाल्याने दादर-माटुंग्यातील प्रेक्षकांना तिथे आमची नाटके पाहता येतील. सगळीच नाटके चालत नसल्याचा नाट्यगृह व्यवस्थापनाने विचार करायला हवा. विनय आपटे प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या एकांकिका महोत्सवासाठीही पूर्ण भाडे आकारण्यात आल्याचेही जाधव म्हणाले. 

चर्चेचे आवाहन निर्मात्यांना केले, पण ते आले नाहीत. नाटकांच्या तारखा परस्पर विकू नका विकायची असल्यास नाट्यगृहाकडे सुपुर्द करा, हेच आमचे म्हणणे आहे. नवीन निर्मात्यांना संधी द्यायला हवी. काही नाटकांचे प्रयोग न झाल्याने नाट्यगृहाचे नुकसान झालेले नाही. - बजरंग चव्हाण, कार्यकारी विश्वस्त, श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्ट

Web Title: The dispute between the Shree Shivaji Mandir theater and some theater producers that has been going on since December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.