मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीचे वेळापत्रक अखेर जाहीर झाले असून ही सुनावणी ७ डिसेंबरला सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापर्यंत चालणार आहे. वेळापत्रकानुसार १३ ऑक्टोबरपासून पुढील सुनावणी सुरू होणार असून ती २३ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. मात्र निर्णयाच्या दिशेने नेणारी उलटतपासणी २३ नोव्हेंबरनंतर सुरू हाेणार असून त्यासाठीचा अवधी निश्चित झालेला नाही. त्यामुळे या सुनावणीचा निकाल पुढील वर्षीच या ‘लोकमत’ने दिलेल्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे.
शिवसेनेच्या दोन्ही गटांना हे वेळापत्रक पाठविण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वतीने महान्याय अभिकर्ता (सॉलिसिटर जनरल) तुषार मेहता हे वेळापत्रक सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करणार आहेत.
असे आहे वेळापत्रक
n१३ ऑक्टोबर - सर्व याचिका एकत्र करायच्या की नाही, यावर सुनावणी. ठाकरे गटाचा युक्तिवाद. कागदपत्रे रेकॉर्डवर आणण्याबाबत युक्तिवाद.n१३ ते २० ऑक्टो. - सचिवालयात दाखल कागदपत्रांची, आदेशांची पाहणी करण्यासाठी, कागदपत्रे शोधण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वकिलांना संधी.n२० ऑक्टोबर - अपात्रतेबाबत सर्व याचिकांची सुनावणी एकत्र व्हावी किंवा नाही यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय जाहीर करतील.n२७ ऑक्टोबर - दाखल कागदपत्रांपैकी कोणती स्वीकारायची आणि कोणती नाकारायची यावर दोन्ही पक्ष आपापले म्हणणे मांडतील.n६ नोव्हेंबर - अपात्रतेबाबतच्या निर्णयावर दोन्ही पक्ष आपापले म्हणणे लेखी सादर करून त्याच्या प्रती एकमेकांना देतील.n१० नोव्हेंबर - अपात्रतेबाबत निर्णय घेताना कोणते मुद्दे विचारात घेऊन नक्की केले पाहिजेत यावर विधानसभा अध्यक्ष दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकतील.n२० नोव्हेंबर - दोन्ही पक्ष त्यांच्या साक्षीदारांची यादी व प्रतिज्ञापत्र दाखल करतील आणि एकमेकांना लेखी स्वरूपात देतीलn२३ नोव्हेंबर - उलटतपासणी सुरू होईल आणि आवश्यकतेनुसार तसेच दोन्ही पक्षांच्या व वकिलांच्या सोयीनुसार तारखा देण्यात येतील. उलटतपासणी आठवड्यातून दोनदा होईल.nअंतिम युक्तिवाद - वरील सर्व प्रक्रिया संपल्यावर दोन आठवड्यानंतर अंतिम सुनावणीसाठी तारीख ठरवणार.
ना दिरंगाई, ना घाई याचिकांवरील सुनावणी करताना कोणत्याही प्रकारची दिरंगाई केली जाणार नाही; परंतु कोणत्याही प्रकारची घाईही केली जाणार नाही. ज्यामुळे अन्याय होईल. अध्यक्ष हे घटनात्मक पद आहे. न्यायालयानेही योग्य ती सूचना दिली आहे. न्यायालयाचा मान राखला जाईल. अध्यक्षांचीही बाजू न्यायालयात मांडली जाईल. - राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष
केवळ वेळकाढूपणा हे वेळापत्रक म्हणजे धूळफेक आहे. साक्ष आणि तपासणी हे फक्त वेळ काढण्यासाठी आहेत. वेगवेगळ्या सुनावणीची गरज नाही. वेळकाढूपणा न करता विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण महिनाभरात संपवावे. - आ. अनिल परब, प्रवक्ते शिवसेना (ठाकरे गट)