खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटाचा फुटला ‘दिवाळी बॉम्ब’; पुण्यासाठी अडीच हजार, सावंतवाडी पाच हजार रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 12:01 PM2023-11-16T12:01:02+5:302023-11-16T12:01:35+5:30
दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्ताने मुंबईतील अनेक नोकरदार, विद्यार्थी किंवा कामगार आपल्या गावी जातात.
मुंबई : दिवाळी एसटी किंवा रेल्वेचे तिकीट न मिळाल्याने, प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सची वाट धरावी लागली, तर ऑनलाइन पद्धतीने दुप्पट-तिप्पट भाडे आकारले जात आहे. त्यांच्यावर कारवाईचा इशारा देऊनही खासगी ट्रॅव्हल्स चालक सुधारत नाहीत. भाऊबीजेच्या दिवशी मुंबईहून पुण्यासाठी अडीच हजार, तर मुंबईहून सावंतवाडीसाठी पाच हजार रुपये आकारण्यात येत आहेत.
दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्ताने मुंबईतील अनेक नोकरदार, विद्यार्थी किंवा कामगार आपल्या गावी जातात. त्यांना दुप्पट तिप्पट भाडे मोजावे लागत आहे. खासगी बससेवांना तात्पुरत्या कालावधीसाठी एसटीच्या तिकिटांपेक्षा दीडपट अधिक भाडे आकारण्यास मुभा आहे. मात्र, ट्रॅव्हल्सचा प्रवास त्याहीपेक्षा जास्त महाग आहे. मुंबई-पुणे, पुणे-नागपूर, औरंगाबाद-मुंबई, कोल्हापूर-नागपूर आणि सोलापूर-नाशिक या मार्गांसह अन्य मार्गांवर प्रवास करण्यासाठी अनेकदा प्रवाशांची खासगी बस वाहतूकदारांकडून लूट केली जात आहे.
दीडपट तिकीट दर आकारण्याचे बंधन
राज्य सरकारने एप्रिल २०१८ मध्ये निर्णय घेत खासगी बस वाहतूकदारांवर बंधने आणली. या निर्णयानुसार, एसटी महामंडळाच्या तिकीट दराच्या तुलनेत खासगी वाहतूकदारांना केवळ दीडपट तिकीट दर आकारण्याचे बंधन घातले आहे. त्यापेक्षा अधिक पैसे घेतल्यास संबंधित वाहतूकदारांवर कारवाई केली जाते.
कारवाईसाठी परिवहन विभागाचे पथक
खासगी बससोबतच खासगी बस आरक्षित करणाऱ्या ऑनलाइन संकेतस्थळावरील खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागाचे पथक नेमण्यात आले आहे. हे पथक स्वतः तिकीट आरक्षित करेल. नियमापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या बस चालकावर कारवाई केली जाईल, असे परिवहन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.