लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुलुंडमधील पालिका रुग्णालयातील बोगस डॉक्टरचे प्रकरण ताजे असतानाच, शिवाजीनगरमध्ये एका खासगी क्लिनिकमध्ये गेल्या तीन वर्षात बोगस डॉक्टर रुग्णांना उपचार देत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
शिवाजीनगर येथे एका दवाखान्यात बोगस डॉक्टर उपचार करत असल्याची माहिती मिळताच पथकाने डमी रुग्ण पाठवून चौकशी केली. अखेर, केलेल्या तपासात दवाखाना मालक डॉ. मोहम्मद सज्जाद मूजतबा शेख (४४) याने, मोहम्मद अफजल मो. अफरोज शेख याच्याकडे कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच महाराष्ट्र मेडिकल काैन्सिलमध्ये त्याची नोंदणी नसल्याचे माहीत असूनही त्याला डॉक्टर म्हणून दवाखान्यात बसविले तसेच, दवाखान्यात बेकायदेशीर औषधेही ठेवली. अफजल हा डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांवर उपचार करत होता. अखेर, त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवत कारवाई करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या दहशतवाद विरोधी कक्षाने ही कारवाई केली आहे.