Join us

डाॅक्टर गेला मुंबईच्या समुद्रात, कपडे केले लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 1:02 PM

दारू पिऊन जुहू बीचवर जाणे पडले महागात

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जुहू चौपाटीवर पोहायला गेलेल्या एका रशियन डॉक्टरचे कपडे आणि मोबाइल पळवून नेल्याचा प्रकार सोमवारी उघड झाला आहे. या प्रकरणी त्यांनी सांताक्रुझ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे.

तक्रारदार डॉक्टर किरिल अगोरीच (३३) हे अंधेरीच्या बॉलीवूड हॉटेलमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून राहत असून, ते रशियन नागरिक आहेत. दोन वर्षांपासून त्यांचे मुंबईत वास्तव्य आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांना मद्यपानाचे व्यसन असून, ते बऱ्याचदा फिरण्यासाठी जुहू चौपाटीला जातात. नेहमीप्रमाणे १४ जुलै रोजी दुपारी त्यांनी मद्यप्राशन केले आणि जुहू चौपाटीच्या समुद्रात पोहण्यासाठी उतरले. त्याआधी मोबाइल आणि कपडे काढून बीचवर ठेवले. मात्र, तासाभरानंतर ते पोहून परत आल्यावर त्यांना त्यांचे साहित्य गायब झाल्याचे आढळले.

 डॉ.अगोरीच हे मद्याच्या नशेत असल्याने, त्यावेळी त्यांना काहीच कळत नव्हते, त्यामुळे ते राहत असलेल्या हॉटेलमध्ये निघून गेले. मात्र, शुद्धीत आल्यावर त्यांच्या लक्षात आले की, त्यांचा मोबाइल आणि अन्य साहित्य अनोळखी व्यक्तीने पळवून नेले आहे. या प्रकरणी त्यांनी सांताक्रुझ पोलिस ठाण्यात धाव घेत, अनोळखी चोराच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीपाऊसमुंबई