बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाईन विक्रीची कवाडे खुली, मुंबईतील महिलांच्या रोजगारासाठी महापालिकेचा उपक्रम

By जयंत होवाळ | Published: June 22, 2024 08:32 PM2024-06-22T20:32:29+5:302024-06-22T20:32:53+5:30

पालिकेच्या नियोजन विभागातर्फे महिला बचत गटांना रोजगार मिळवून देण्यासाठी विविध योजना अंमलात आणल्या जातात.

The doors of online sale of products of self-help groups are open, a municipal initiative for employment of women in Mumbai | बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाईन विक्रीची कवाडे खुली, मुंबईतील महिलांच्या रोजगारासाठी महापालिकेचा उपक्रम

प्रतिकात्मक फोटो...

मुंबई : महापालिकेने अर्थसहाय्य केलेल्या बचत गटांची उत्पादने ऑनलाईन उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यात दररोज नवनवीन उत्पादनांची भर पडत आहे आणि अधिकाधिक महिलांना रोजगार मिळत आहे.

पालिकेच्या नियोजन विभागातर्फे महिला बचत गटांना रोजगार मिळवून देण्यासाठी विविध योजना अंमलात आणल्या जातात. या महिलांनी तयार केलेली उत्पादने पारंपरिक पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पालिकेने व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. आता त्यात ऑनलाईन विक्रीचाही पर्याय खुला करून देण्यात आला आहे. महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने https://shgeshop.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

पालिकेने अर्थसहाय्य केलेले मुंबई शहर, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरांत आठ हजारांपेक्षा अधिक बचत गट आहेत. प्रत्येक बचत गटात दहा सदस्य आहेत. या सर्व महिलांना त्यांचे घरकाम सांभाळून कुटुंबासाठी हातभार लावता यावा यासाठी विविध वस्तू, उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

गरजू महिलांना रोजगार मिळावा, महिला बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यातून महिला आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी नियोजन विभागाने पालिकेच्या २४ विभागांत महिला बचत गटांच्या वस्तूंना प्रदर्शने, व्यापारी संकुले, यात्रा, उत्सवांमध्ये विक्री करण्याची संधी मिळवून दिली आहे. तसेच या महिला आपली उत्पादने काही दुकानांमार्फतही ग्राहकांना पुरवत आहेत.

महिलांना प्रशिक्षण
होतकरू मराठी मुलांनी नव उद्योगाच्या (स्टार्ट अप) माध्यमातून https://shgeshop.com हे संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळावर विविध ग्राहकोपयोगी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पालिकेने अर्थसहाय्य केलेल्या बचत गटांतील महिलांना याच मुलांच्या माध्यमातून ऑनलाईन ऑर्डर कशी स्वीकारावी, त्यानंतर ग्राहकांना संबंधित वस्तू कशी विकावी, ऑनलाईन व्यवहार कसा करावा, याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

पहिल्या टप्प्यात ५० बचत गट
ऑनलाईन व्यवसायासाठी नियोजन विभागाने बचत गटांची वर्गवारी केली आहे. त्यानुसार ज्या बचत गटांची उत्पादने (खाद्यपदार्थ वगळून) टिकावू असतील, त्यांना ऑनलाईन विक्रीसाठी पुढे केले आहे. पुढील टप्प्यांत साधारण महिनाभर टिकू शकतील, असे खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या बचत गटांनाही ऑनलाईन विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली.

कोणत्या वस्तू ऑनलाईन ?
उटणे, अगरबत्ती, जूटबॅग्ज, इमिटेशन ज्वेलरी, मोत्याचे दागिने, साड्या, रांगोळी, परफ्यूम, ड्रेस, लेडीज कुर्तीज्, फॅन्सी कँडल्स, विविध प्रकारचे आकर्षक तोरण, दिवाळीसाठी कंदील, आकर्षक पणत्या, बांबूच्या आकर्षक वस्तू तसेच सजावटीचे आकर्षक साहित्य.
 

Web Title: The doors of online sale of products of self-help groups are open, a municipal initiative for employment of women in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.