मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीने ऑगस्ट महिन्यात काढण्यात आलेल्या ४ हजार ८२ घरांच्या लॉटरीनंतर आता पुन्हा एकदा एप्रिल-महिन्यांत सुमारे ६००हून अधिक घरांची लॉटरी काढण्यासाठी म्हाडाने तयारी सुरु केली आहे. ऑगस्ट महिन्याच्या लॉटरीतील अर्जदारांनी परत केलेल्या ६०० घरांचा या लॉटरीमध्ये समावेश करण्यात आला असून, आणखी काही घरे या नव्या लॉटरी घेता येतील का? याबाबत म्हाडा चाचपणी करत आहे.
म्हाडा लॉटरीसाठी नवीन संगणकीय प्रणाली वापरत आहे. नवीन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण व पात्रता निश्चितीनंतरच अर्जदार लॉटरीप्रक्रियेत सहभागी होत आहेत. मंडळातर्फे लॉटरी पश्चात प्रक्रियाही ऑनलाइन करण्यात आली असून, यशस्वी अर्जदारांना प्रथम सूचना पत्र पाठविणे, तात्पुरते देकार पत्र पाठविणे, अर्जदाराने २५ टक्के विक्री किमतीचा भरणा करण्याचे पत्र, ७५ टक्के रक्कम गृहकर्जामार्फत उभारण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे, वितरण आदेश देणे (मुद्रांक शुल्काचा भरणा करणे, दस्त नोंदवणे), ताबा पत्र देणे, ताबा पत्राची प्रत संबंधित कार्यकारी अभियंता यांना पाठविणे या सर्व प्रक्रियाप्रणालीमार्फत ऑनलाइन करण्यात आल्या आहेत.
- सर्वप्रक्रियेत सर्व पत्र संबंधित अर्जदारांना संबंधित अधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीने जात आहेत. यामुळे बनावट, खोटी कागदपत्र बनविणाऱ्यांना चाप बसणार आहे. या सर्व पत्रांवर क्यूआर कोड टाकण्यात आला असून, क्यूआर कोडद्वारे या कागदपत्रांची सत्यता क्षणार्धात तपासता येणार आहे. शिवाय कागदपत्रांची दुय्यम अथवा बनावट प्रत तयार करून नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रकार टाळता येणार आहेत.- ४ हजार ८२ घरांपैकी १ हजार २५० विजेत्यांनी घरांचा ताबा घेतला आहे. ६०० विजेत्यांनी घरे परत केली आहेत. घरांच्या किमती, घरांसाठी कर्ज मिळाले नाही किंवा काही कारणाने त्यांना दावा करता आलेला नाही, अशी घरे म्हाडाला विजेत्यांकडून परत केली जात आहेत. ७० विजेत्यांनी दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याने त्यांना बाद केले आहे.- अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथील ४,०८२ घरांची लॉटरी १४ ऑगस्ट २०२३ रोजी काढण्यात आली होती.