मुंबई - कोरोनाकाळात वडिलांचे निधन झाले. त्यांच्या जागी आयकर खात्यात ‘ती’ लिपिक म्हणून रुजू झाली. आई आणि बहिणीची जबाबदारी समर्थपणे पेलू लागली. दिवाळीत तिचे लग्नही होणार होते. आपल्या सुखी संसाराचे चित्र रंगवत ‘ती’ रविवारी खरेदीसाठी लालबागमध्ये आपल्या होणाऱ्या पतीबरोबर आली होती. मात्र, मद्यपी दत्ता शिंदेमुळे ‘बेस्ट’ची बस तिच्यासाठी ‘काळ’ बनून आली. त्यात तिचा मृत्यू झाला. नुपुरा मणियार (२८), असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे.
लालबाग येथे रविवारी ‘बेस्ट’च्या धडकेत दहा जण जखमी झाले होते. उपचारादरम्यान सोमवारी तिचा मृत्यू झाला. तिचा प्रियकरही या अपघातात जखमी झाला आहे. अपघातातील चार जखमींवर परळच्या ग्लेनेगल ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दत्ता शिंदेला अटकलालबागचा राजा सोसायटीतील तीन नंबर इमारतीत राहणाऱ्या दत्ता शिंदेला काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी त्याने दारूच्या नशेत कुलाब्यावरून लालबागसाठी ६६ क्रमांकाची इलेक्ट्रिक बस पकडली. रात्री साडेआठ वाजता लालबाग चौक सिग्नलला बसचा दरवाजा उघडला नाही म्हणून त्याने चालकासोबत वाद घातला. रागात चालकाची कॉलर पकडून पाठीत बुक्की मारली. त्याचा स्टिअरिंगवरील हातावर हिसका दिला. याच दरम्यान चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व पुढील अनर्थ घडला.