- संतोष आंधळे
मुंबई - गेली तीन वर्षांपासून जे.जे. रुग्णालयातील विद्यार्थी वर्गात विशेष प्रिय असणारा मरिन लाइन्स येथील जे.जे. जिमखाना धूळखात पडला आहे. छप्पर कोसळले, भिंतींना भेगा गेल्यामुळे या जिमखान्यात सुविधांपासून विद्यार्थी वंचित होते. अखेर वैद्यकीय शिक्षण विभागाने याची दखल घेत नूतनीकरणासाठी १४ कोटी ८८ लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जे.जे. रुग्णालयासाठी संलग्न असलेल्या ग्रांट मेडिकल कॉलेजमध्ये एम.बी.बी.एस.च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हक्काचे ठिकाण म्हणजे जे.जे. जिमखाना असतो. या ठिकाणी त्यांच्या सर्व स्पर्धा आयोजित केल्या जातात. मात्र, कोरोना काळानंतर या जिमखान्याची अत्यंत बिकट अवस्था झाली. आजूबाजूच्या परिसरात माेठ्या प्रमाणात गवत वाढले. परिणामी तेथे कार्यक्रम करण्यास विद्यार्थ्यांवर बंधने आली. दरवर्षी नवीन विद्यार्थी एम.बी.बी.एस. पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात त्यावेळी त्यांच्यासाठी फ्रेशर पार्टीचे आयोजन याच ठिकाणी केले जाते. तसेच, सांस्कृतिक कार्यक्रमाशी संबंधित अस्तित्व महोत्सवाचे आयोजन केले जाते. क्रीडा प्रकाराशी संबंधित कुरुक्षेत्र कार्यक्रमाचेही आयोजन जिमखान्यातच केले जाते. मात्र, या ठिकाणी दयनीय अवस्था झाल्याने कार्यक्रम करण्यास बंदी घालण्यात आली. नूतनीकरणामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा जिमखाना वापरण्यास मिळणार आहे. विशेष म्हणजे हा जिमखाना सांभाळण्यासाठी शारीरिक प्रशिक्षकांची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे.
‘लग्नासाठी वापर टाळा’जिमखाना मरिन लाइन्स येथील मोक्याच्या ठिकाणावर आहे. त्याच्या आजूबाजूलाही मोठे जिमखाने आहेत. त्याठिकाणी श्रीमंत मंडळी लाखो रुपये खर्च करून जिमखाना भाड्याने घेऊन लग्न आणि अन्य समारंभ आयोजित करतात. विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जिमखान्याचा वापर विद्यार्थ्यांसाठी होणे गरजेचा आहे. मात्र, अनेकवेळा जिमखाना ठेकेदाराला चालविण्यासाठी दिला जातो. याचा वापर लग्नकार्य आणि समारंभासाठी होऊ नये, जिमखाना हे पैसे कमविण्याचे साधन नव्हे. त्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विभागाने विशेष प्रयत्न केले पाहिजे.नूतनीकरण होऊन जिमखाना सुरू होणार असेल तर विद्यार्थ्यांना त्याचा आनंदच आहे. सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धा त्या ठिकणी आयोजित करता येतील.- महेश जाधव, सरचिटणीस, ग्रांट मेडिकल कॉलेज