मुंबई - राजधानी मुंबईतील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीसह त्यांच्या निकटवर्तीयांची ११.१५ कोटींची मालमत्ता जप्त केली. जप्त मालमत्तांत राऊत यांच्या पत्नीच्या नावावरील दादरच्या फ्लॅटसह निकटवर्तीयांच्या रायगड व पालघरमधील मालमत्तांचा समावेश आहे. या कारवाईनंतर राज्यातील राजकारणातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. भाजपने या कारवाईचे समर्थन केलं आहे. तर, मनसेनं राऊत यांची खिल्ली उडवली आहे.
माझे राहते घर व स्वकष्टाने मिळविलेल्या जमिनीवर ईडीने जप्तीची कारवाई केल्याने भाजपला उकळ्या फुटत असेल, अशा कारवाईला मी घाबरत नाही. १ रूपया जरी अवैध असेल तर ती संपत्ती भाजपला दान करेल, अशा शब्दात राऊत यांनी कारवाईनंतर प्रतिक्रिया दिली. तसेच, महाराष्ट्रात सेनेसोबत भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा धमक्या मला दिल्या. महाराष्ट्रातही लवकरच कारवाईचे सत्र पाहायला मिळेल, असेही राऊत यांनी सांगितले. राऊत यांच्यावरील या कारवाईनंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी, जर भ्रष्टाचार केला नसेल तर घाबरायचं कारण नाही, असे म्हणत ईडी कारवाईचे समर्थन केलं.
मनसेनंही राऊत यांच्या या कारवाईनंतर त्यांची खिल्ली उडवली आहे. मनचिसेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी ट्विट करुन या कारवाईसंदर्भात मत व्यक्त केलं आहे. राज ठाकरेंनी गुढी पाडव्याला केलेल्या भाषणातील मुद्दा जोडत खोपकर यांनी राऊतांची खिल्ली उडवली. मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते. ED ने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच कारवाई केली, अशी बोचरी टीका मनसेनं केली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही हे ट्विट रिट्विट करत राऊतांची खिल्ली उडवली आहे.
दरम्यान, संदीप देशपांडे यांनी संजय राऊत हे शरद पवारांचा भोंगा वाजवत असल्याची टीका केली होती. तत्पूर्वी, राज ठाकरेंचे भाषण म्हणजे भाजपचा भोंगा असल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं.
काय आहे ईडीची कारवाई
प्रवीण राऊत यांच्या नावे असलेल्या पालघर जिल्ह्यातील जमिनीसह राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत तसेच स्वप्ना पाटकर या दोघींच्या नावावरील अलिबागमधील किहिम बीच येथील ८ प्लॉटसह वर्षा राऊत यांच्या नावावरील दादर येथील फ्लॅटवर ईडीने टाच आणली. राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या स्वप्ना पाटकर पत्नी आहेत. किहिम बीच येथील ८ प्लॉटच्या खरेदी व्यवहारात नोंदणी, इतर बाबींचे रोख व्यवहार झाले आहेत.
लोकशाहीचे नव्हे, दबावशाहीचे वातावरण केंद्रीय यंत्रणांची कारवाई राजकीय हेतूने सुरू आहे. राऊत यांच्यावर केलेल्या कारवाईत सूडबुद्धी स्पष्ट दिसत आहे. सध्या देशात जे काही सुरू आहे ते लोकशाहीचे नव्हे, तर दबावशाहीचे वातावरण आहे. शिवसेना भाजपसोबत गेली नाही, त्यामुळे या कारवाया सुरू आहेत. - आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री
राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न शिवसेना खा. संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त करण्याअगोदर त्यांना कल्पना देणे आवश्यक होते. या कारवायांच्या माध्यमातून राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. - जयंत पाटील, मंत्री
ही कारवाई राजकीय सूडभावनेतूनसंजय राऊत यांच्या संपत्तीवर केलेली जप्तीची कारवाई ही राजकीय सूडभावनेतून केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार आणण्यात संजय राऊत यांची महत्त्वाची भूमिका आहे. महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने भाजपचे नेते त्रस्त झालेले आहेत. या निराशेतून ईडीला हाताशी धरून खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई केली आहे. - विनायक राऊत, शिवसेना गटनेते, लोकसभा