लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गृहपाठ हा विद्यार्थ्यांच्या अभ्यासात दृढीकरण करण्यासाठी उपयुक्त ठरत असतो. अलीकडे त्यामध्ये तोच तोचपणा आला आहे, त्यामुळे त्यात कृतियुक्त बदल आवश्यक आहेत. मात्र, तो पूर्णपणे बंद करणे हा त्यावरील उपाय नाही. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी गृहपाठ बंद करण्याच्या निर्णयावर आधी स्वतः या विषयाचा सखोल अभ्यास करावा व नंतर निर्णय घ्यावा, अशा प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून उमटत आहेत.
मुलांवरील अभ्यासाचे ओझे कमी करण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ (होमवर्क) बंद करण्याच्या विचार सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी दिली. या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रातून आणि पालकांमधून याला तीव्र विरोध होत आहे.
शिक्षक संघटना, संस्थाचालक यांच्याशी चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले असले तरी सर्व स्तरातून या विचारालाच विरोध होत आहे. गृहपाठ मुलांना व पालकांना ओझे वाटू नये, रंजक असावा, कल्पकतेला वाव देणारा असावा अशाप्रकारे खऱ्या प्रयोगशील शिक्षकांकडून आणि जमिनीवरील शिक्षण तज्ज्ञांकडून गृहपाठाची मांडणी व स्वरूप निश्चिती करता येईल, मात्र सरसकट गृहपाठच न देण्याचा निर्णय झाल्यास ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अधिकच गर्तेत जाईल, अशी प्रतिक्रिया, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी दिली.
सरकारी शाळांकडे विद्यार्थी व पालकांचा कल वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर गृहपाठ न देण्याचा निर्णय झाल्यास तो सरकारी शाळांसाठी बंधनकारक राहील. खासगी इंग्रजी शाळा गृहपाठच काय तर कोणत्याही गोष्टीची सक्ती करू शकतात. त्यामुळे इंग्रजी शाळा या निर्णयाचे बंधन पाळतील असे वाटत नाही. या पार्श्वभूमीवर गृहपाठ बंद करण्याचा निर्णय हा सरकारी शाळेला कमकुवत करू शकताे, असे मत शिक्षक व्यक्त करीत आहेत.
कोणत्याही शिक्षणप्रक्रियेत सराव अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर शिकवलेल्या भागाचे आकलन कितपत झाले, हे मूल्यमापन करण्यासाठी गृहपाठ हे एक साधन आहे. फक्त शालेय कामकाजात होणारे शिक्षण पुरेसे नाही तर शाळेतून घरी गेल्यानंतरदेखील त्यावर काही कृती आवश्यक आहे. यातून लेखन कौशल्य विकसित होतात, अक्षरातील दोष लक्षात येतात, म्हणून मर्यादित स्वरूपात गृहपाठ आवश्यक आहेत. अन्यथा तीन महिन्यांनंतर झालेल्या चाचणी परीक्षेतनंतरच विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी अचानक समोर येईल हे शिक्षण प्रक्रियेला घातक आहे. - महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता, राज्य मुख्याध्यापक