लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मागील काही वर्षांत शहर उपनगरांत प्ले स्कूल, प्री प्रायमरी, केजी, नर्सरी शाळा सर्रासपणे सुरू करण्यात आल्या आहेत, त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नव्हते. परंतु आता या शाळा अशाच मनमानी पद्धतीने चालवता येणार नाहीत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता या शाळा सुरू करताना शिक्षण विभागाची परवानगी आवश्यक असून शिक्षण विभागाचे यावर नियंत्रण असणार आहे. यात शाळांची नियमित तपासणी केली जाईल, तसेच शाळांमध्ये विद्यार्थी मूल्यमापनदेखील केले जाणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाविषयी प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी प्रभावी पण राबविण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी तर अंगणवाड्यादेखील प्राथमिक शाळांना जोडले जाणार आहेत. त्यामुळे प्ले ग्रुप, केजी, सिनिअर केजी या शाळांच्या नावाखाली अवाजवी शुल्क घेणे, मनमानी पद्धतीने शाळा चालवणे, शुल्क निर्धारित न ठेवणे या सर्व बाबींवर अंकुश बसणार असून, या शाळांना शिक्षण विभागाची परवानी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे, त्यामुळे मनमानी होणार नाही, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
आता शिक्षण विभाग ठेवणार लक्षआजवर मोठ्या प्रमाणात खासगी पद्धतीने नर्सरी, केजी, प्ले ग्रुप असे वर्ग घेऊन शाळा चालविण्यात आल्या आहेत. यावर आता शिक्षण विभागाचे लक्ष राहणार असून, त्यांना परवानगी घेणे बंधनकारक असले. शिवाय अंगणवाडीदेखील शाळांना जोडली जाणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार त्यांना वयानुसार, मानसिक विकासानुसार शिक्षण देणे अनिवार्य असणार आहे.