"निवडणुका घेऊ नयेत, घेतल्या तर.."; मनोज जरांगेंचा आक्रमक पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 14:51 IST2024-02-21T14:44:57+5:302024-02-21T14:51:34+5:30
आणखी १-२ दिवस तुमच्याकडे आहेत, २४ तारखेपासून मराठा समाज राज्यभर आंदोलन करेल, अशी घोषणाच जरांगे यांनी केली

"निवडणुका घेऊ नयेत, घेतल्या तर.."; मनोज जरांगेंचा आक्रमक पवित्रा
मुंबई - सरकारनं सगेसोयरेबाबत जी अधिसूचना काढली होती त्याची अंमलबजावणी व्हायला हवी होती. विशेष अधिवेशन घेऊन सरकारनं काय केले?, असा सवाल उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी विचारला. तसेच, तुम्ही स्वत:ला मोठे समजत असाल पण जनता समजत नाही. मोटारसायकल दिली पण पेट्रोल दिलं नाही अशी अवस्था आहे. जर तुम्ही सगेसोयरेबाबतची अंमलबजावणी करून मराठा आरक्षण दिले असते तर १५ दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला निसता, असे म्हणत जरांगे यांनी आंदोलनाची पुढील दिशा सांगितला. तसेच, २४ फेब्रुवारीपासून आंदोलन करणार असून आगामी निवडणुका न घेण्याची मागणीही जरांगे यांनी केली आहे.
आणखी १-२ दिवस तुमच्याकडे आहेत, २४ तारखेपासून मराठा समाज राज्यभर आंदोलन करेल, अशी घोषणाच जरांगे यांनी केली. तसेच, आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातच सरकारला दणका बसेल असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जरांगेंनी निवडणूक आयोगाकडे, निवडणुका न घेण्याची विनंती केली आहे. 'सगेसोयरे' अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी मनोज जरांगे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच, आयोगाने निवडणूक घेतली तर प्रचाराची गाडी ताब्यात घ्या, असे आवाहनही त्यांनी मराठा समाज बांधवांना केलं आहे.
जरांगे यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाष्य करताना सर्वपक्षीय नेत्यांनाही इशारा दिला आहे. २४ फेब्रुवारीपासून आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार असून एकाही नेत्याने आमच्या घरापर्यंत येऊ नये, आमच्या वावरातून कुणीही जाऊ नये, असे म्हणत राजकीय नेत्यांना इशाराच दिला आहे. राज्यातील वृद्धांनाही उपोषण करण्याचं आवाहन जरांगेंनी केलं असून वृद्धांनी उपोषणाला बसावं, एका रांगेत उपोषण करावं, असे त्यांनी म्हटले. तसेच, उपोषण करताना एकाचा जरी जीव गेला तरी, ती शिंदे-फडणवीस यांची जबाबदारी राहील, असा इशाराही त्यांनी दिला.