बंधुप्रेमाचा ‘भावनिक’ प्रसंग... लिफ्टमध्ये गेलेल्या धाकट्याला वाचविले थोरल्याने, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 08:00 AM2023-09-02T08:00:59+5:302023-09-02T08:01:08+5:30

या दुर्घटनेत दुर्दैवी बालकाचा अंगठाच कापला गेला. मात्र, धीरोदात्तपणे या संकटाचा सामना करणाऱ्या मोठ्या भावाच्या मदतीला जे.जे. तील डॉक्टर धावून आले.

The 'emotional' episode of brotherly love... The elder saved the younger who went in the lift, but... | बंधुप्रेमाचा ‘भावनिक’ प्रसंग... लिफ्टमध्ये गेलेल्या धाकट्याला वाचविले थोरल्याने, पण...

बंधुप्रेमाचा ‘भावनिक’ प्रसंग... लिफ्टमध्ये गेलेल्या धाकट्याला वाचविले थोरल्याने, पण...

googlenewsNext

मुंबई : खेळता खेळता दोन वर्षांचा धाकटा भाऊ लिफ्टमध्ये शिरला. तो त्यात अडकू नये या भीतीपोटी सात वर्षे वयाच्या मोठ्या भावाने त्याला लिफ्टमधून बाहेर काढले. मात्र, लिफ्टमधून बाहेर पडत असताना मोठ्या भावाचा हात लिफ्टच्या दरवाज्यात अडकला. त्याचवेळी लिफ्ट नेमकी खाली जाऊ लागली.

या दुर्घटनेत दुर्दैवी बालकाचा अंगठाच कापला गेला. मात्र, धीरोदात्तपणे या संकटाचा सामना करणाऱ्या मोठ्या भावाच्या मदतीला जे.जे. तील डॉक्टर धावून आले. तुटलेल्या अंगठ्याचे प्रत्यारोपण करण्यात डॉक्टर यशस्वी ठरले आणि कहाणी सुफळ संपूर्ण झाली.
मोठ्या भावाचे नाव भावनिक कुमार आणि धाकट्याचे मानविक. दोघेही पनवेल येथील फॉर्च्युन कॅलिप्सो या बहुमजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहतात.

बुधवारी भावनिक आणि मानविक दुपारी खेळत असताना अचानक मानविक घराबाहेरील लिफ्टकडे पळत सुटला. तो लिफ्टमध्ये शिरताच भावनिकने धोका जाणला. त्याने पळतच लिफ्ट गाठली आणि मानविकला बाहेर काढले. मात्र, या धांदलीत त्याचा हात लिफ्टच्या दरवाज्यात अडकून अंगठा तुटला. 

जे.जे. मध्ये शस्त्रक्रिया
पहिलीत शिकणाऱ्या भावनिकचा आरडाओरडा ऐकून आई धावत आली. इमारतीतील रहिवाशांच्या मदतीने त्याला तत्काळ स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. त्याचा तुटलेला अंगठाही बरोबर घेतला गेला. स्थानिक रुग्णालयाने अंगठा नीट ठेवत प्रत्यारोपणासाठी जे.जे.मध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार भावनिकच्या आई-वडिलांनी जे.जे. रुग्णालय गाठले. प्लॅस्टिक सर्जरीच्या डॉक्टरांनी सर्व मूलभूत चाचण्या करून गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अंगठ्याच्या प्रत्यारोपण ऑपरेशनास सुरवात केली. अखेर सकाळी ७ वाजता ऑपरेशन यशस्वी झाले. 

अवयव कापला गेल्यावर काय काळजी घ्यावी?  
अनेकदा विचित्र अपघातात व्यक्तीची बोटे कापली जातात. अशावेळी कापल्या गेलेला अवयव निर्जंतूक करून स्वच्छ कपड्यात ठेवावा. त्यानंतर ते एका प्लास्टिक पिशवीत ठेवावे. त्याच्या बाहेरून त्यावर बर्फ ठेवावा. थेट बर्फाचा संपर्क त्या बोटाशी येता काम नये. बोट असेल तर आठ ते दहा तासात तो डॉक्टरकडे न्यावा. कारण बोटात स्नायू नसतात. मात्र इतर अवयवांमध्ये स्नायू असतात. त्यावेळी मात्र सहा तासांच्या आत रुग्णालयात उपचार करणे गरजेचे असते.

मुलाच्या पालकांनी तुटलेला अंगठा सुस्थितीत ठेवला, हे महत्त्वाचे. तुटलेला अंगठा पुन्हा जोडणे आव्हानात्मक होते. मुलाचा अंगठा तुटल्याने त्याच्यातील रक्तवाहिन्या खराब झाल्या होत्या. त्यामुळे त्याच हाताच्या रक्तवाहिन्या काढून अंगठा पुन्हा जोडला. आमच्या मते ऑपरेशन चांगले झाले आहे. मात्र अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत पहिले पाच ते सहा दिवस महत्त्वाचे असतात. त्याची हालचाल कशी होते हे पाहावे लागते. रक्ताचा प्रवाह सुरळीत चालू राहणे गरजेचे असते. यापूर्वी अशी अवघड शस्त्रक्रिया केल्याचा अनुभव कामी आला. 
- डॉ. योगेश जयस्वाल, प्लास्टिक सर्जन, जे.जे. रुग्णालय

Web Title: The 'emotional' episode of brotherly love... The elder saved the younger who went in the lift, but...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई