प्रसार भारतीच्या कर्मचाऱ्यांनी उपसले निदर्शनाचे हत्यार
By संजय घावरे | Published: October 5, 2023 07:40 PM2023-10-05T19:40:32+5:302023-10-05T19:41:31+5:30
मुंबईसोबतच लखनौ, बनारस, प्रयागराज, गोरखपूर, कानपूर, बरेली, नजीबाबाद, दिल्ली, कोलकाता येथे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या कार्यालयांसमोर देशव्यापी शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली.
मुंबई - प्रसार भारतीकडून कर्मचाऱ्यांमध्ये केला जाणारा भेदभाव दूर करण्यासाठी प्रसार भारतीच्या कर्मचाऱ्यांनी देशव्यापी शांततापूर्ण निदर्शने केली. या अंतर्गत मुंबई दूरदर्शन केंद्र आणि मुंबई आकाशवाणी केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर कर्मचारी जमा झाले. यात विविध भारती मुंबई, दूरदर्शन केंद्र मुंबई आणि आकाशवाणी मुंबईच्या कार्यक्रम विभाग, प्रशासन विभाग आणि अभियांत्रिकी विभागातील सर्व प्रसार भारती कर्मचाऱ्यांचा समावेष होता.
मुंबईसोबतच लखनौ, बनारस, प्रयागराज, गोरखपूर, कानपूर, बरेली, नजीबाबाद, दिल्ली, कोलकाता येथे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या कार्यालयांसमोर देशव्यापी शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली. चेन्नई, बेंगळुरू, जयपूर, गुवाहाटी, हैदराबाद, अहमदाबाद, पटना, रांची, शिमला आणि देशातील इतर अनेक मोठ्या आणि छोट्या शहरांमध्येही निदर्शने झाली. जॉइंट अॅक्शन फोरम फॉर प्रसार भारती एम्प्लॉइजच्या (संयुक्त कृती मंच) वतीने निदर्शनाचे आवाहन करण्यात आले होते. जॉइंट अॅक्शन फोरम फॉर प्रसार भारती एम्प्लॉइज, कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी स्थापन केलेले संयुक्त व्यासपीठ असून, केंद्राच्या उच्च अधिकार्यांना या कार्यक्रमाची अगोदरच अधिकृत माहिती देण्यात आली होती.
प्रसार भारती या तारखेनंतर नियुक्त केलेल्या कर्मचार्यांना भेदभावपूर्ण वागणूक दिली जात असल्याच्या निषेधार्थ संयुक्त कृती मंचाने ५ ऑक्टोबर ही तारीख 'काळा दिवस' म्हणून पाळण्याची घोषणा केली आहे. यापूर्वीही प्रसार भारतीच्या कर्मचाऱ्यांनी १९ सप्टेंबर २०२३ रोजी आपल्या मागण्यांबाबत प्रसार भारती सचिवालय, दिल्ली येथे शांततापूर्ण निदर्शने केली होती. मागण्या पूर्ण होत नसल्याने प्रसार भारतीच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा देशव्यापी निदर्शनाचे हत्यार उपसले. निदर्शन करणाऱ्या कर्मचार्यांच्या अनेक मागण्या आहेत, ज्यात समान कामासाठी समान वेतन, भारत सरकारच्या केंद्रीय कर्मचार्यांना चांगल्या आरोग्य सुविधांसाठी प्रदान करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेची (सीजीएचएस) अंमलबजावणी, पदोन्नती आणि इतर लाभांसह विविध मागण्या आहेत.
प्रसार भारती अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे (एपीबीईई) अध्यक्ष हरी प्रताप गौतम म्हणाले की, प्रसार भारती कर्मचाऱ्यांच्या उपचारांसाठी अद्याप कोणतीही ठोस व्यवस्था नाही. कर्मचाऱ्यांना सीजीएचएस लाभ, गट विमा सुरक्षा, कौटुंबिक निवृत्ती वेतन, समान पद-समान वेतन आणि वेळेवर पदोन्नतीसह इतर लाभही मिळावेत, जे प्रसार भारतीमध्ये कार्यरत प्रतिनियुक्तीवर असणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळतात या प्रसार भारतीकडे आमच्या मागण्या आहेत.