Lok Sabha Piyush Goyal : इथल्या कार्यकर्त्यांचा जोश-जल्लोष थेट मोदींपर्यंत पोहोचेल; पीयूष गोयल यांचा उत्तर मुंबईत प्रचाराचा धुरळा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 04:23 PM2024-05-01T16:23:29+5:302024-05-01T16:24:47+5:30
Lok Sabha Piyush Goyal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या गॅरंटीनुसार उत्तर मुंबई हे विकासाचं ज्वलंत उदाहरण ठरेल, असा विश्वास पीयूष गोयल यांनी व्यक्त केलाय.
Lok Sabha Piyush Goyal : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला आता सुरुवात झाली आहे. दोन टप्प्यांतील मतदान पूर्ण झालं असून उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद करण्यात आलंय. मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे. उत्तर मुंबई हा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरतोय. विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी यावेळी पीयूष गोयल यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आलीये. तर मोठ्या प्रतीक्षेनंतर काँग्रेसनं भूषण पाटील यांना उत्तर मुंबईतून उमेदवारी जाहीर झाली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या गॅरंटीनुसार उत्तर मुंबई हे विकासाचं ज्वलंत उदाहरण ठरेल, असा विश्वास पीयूष गोयल यांनी व्यक्त केलाय.
"कार्यकर्त्यांचा हा जल्लोष आणि जोश थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहचेल. मोदी यांनी दिलेली गॅरंटी देशासह उत्तर मुंबईतील महिला आणि तरुणांचे निश्चितच सक्षमीकरण करेल," असं पीयूष गोयल म्हणाले. मालाड येथे भाजपच्या विधानसभा कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
'मतांच्या रुपात मोदींना आशीर्वाद मिळेल'
"सर्व धर्मीय आणि प्रांतांमधील नागरिकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन आहे. मोदींनी गेल्या पाच वर्षात घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयांमुळे जनतेचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. मतदानाच्या दिवशी मतांच्या रूपानं सर्व मोदींना भरभरून आशीर्वाद देतील," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एक मुंबईकर म्हणून मला मुंबईच्या समस्यांची सखोल माहिती आहे. आरोग्य, शिक्षण, वाहतूक, दुर्बल घटकांसाठी आहे त्याच ठिकाणी पुनर्विकास आणि पुनर्वसन करण्याची हमी देत असल्याचे पीयूष गोयल म्हणाले.
सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होणार
उत्तर मुंबईत लवकरच एक हजार बेडचं सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होणार असून त्याचा फायदा उत्तर मुंबईतील रहिवाशांना होणार आहे. मोदींनी २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनविण्याचा निर्धार केला आहे असल्याचंही ते म्हणाले.
चिंचोली येथून प्रचार रथासह निघालेल्या पीयूष गोयल यांच्या या फेरीत खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासोबत हजारो भाजपा तसेच महायुतीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या घटक पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.