Join us

भाऊच्या धक्क्याचे प्रवेशद्वार अखेर उघडले; सकाळी ११ ते ७ पर्यंत वाहनांना देणार प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2022 9:14 AM

मुंबईतील जलवाहतुकीचा कणा मानल्या जाणाऱ्या भाऊच्या धक्क्यावरील मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय मुंबई पोर्ट ट्रस्टने घेतला.

मुंबई : भाऊच्या धक्क्यावरील प्रवेशद्वार बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत मुंबई पोर्ट ट्रस्टने हे प्रवेशद्वार उघडण्याचा निर्णय घेतला असून, सकाळी ११ ते ७ पर्यंत ते खुले राहणार आहे. या काळात वाहनांना आत प्रवेश दिला जाणार आहे.मुंबईतील जलवाहतुकीचा कणा मानल्या जाणाऱ्या भाऊच्या धक्क्यावरील मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय मुंबई पोर्ट ट्रस्टने घेतला. त्यानुसार गुरुवारपासून प्रवेशद्वाराला टाळे लावत बेस्ट बस, टॅक्सीसह खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला. याआधी भाऊच्या धक्क्यावरील तिकीट काऊंटरजवळ बेस्ट बस वा खासगी वाहने उभी राहायची. त्यांना बंदी घातल्याने अलिबाग, ‘जेएनपीटी’ला ये-जा करणाऱ्या प्रवाशांना चालत हे अंतर पार करावे लागत होते.मासेमारीचा बंदीकाळ सुरू असतानाही भाऊच्या धक्क्यावर काहीजण मासेमारीसाठी येत असल्याने त्यांना अटकाव करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण मुंबई पोर्ट ट्रस्टकडून देण्यात आले होते. मात्र, बेकायदा मासेमारी होत असल्यास ती रोखण्यासाठी पोलीस वा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची मदत घ्या, असे गेट बंद करून काय साध्य होणार आहे, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जाऊ लागल्याने पोर्ट ट्रस्टने निर्णयाचा पुनर्विचार केला आहे.

मासेमारीसाठी येणाऱ्यांवर ठेवणार लक्षसुरुवातीला सकाळी ११ ते ७ पर्यंत भाऊच्या धक्क्याचे प्रवेशद्वार खुले ठेवले जाईल. मासेमारीसाठी कोणी आत येतात का, यावर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. त्यांनतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टशी संबंधित अधिकाऱ्याने दिली.

टॅग्स :मुंबई