मुंबई : आंतरराष्ट्रीय खरेदी मानकांचे पालन न केल्यामुळे ‘मेट्रो ६’च्या डब्यांसाठी मागविण्यात आलेली निविदा रद्द करण्याची नामुष्की ‘एमएमआरडीए’वर ओढवली आहे. ‘एमएमआरडीए’ने ‘मेट्रो ६’च्या १३ गाड्यांसाठी निविदा मागाविण्यात येणार असून, विविध परवानग्या मिळाल्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही निविदा प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे.
स्वामी समर्थनगर ते विक्रोळी या ‘मेट्रो ६’ मार्गिकेचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम एप्रिल २०२६ मध्ये पूर्ण होणार आहे. १६ किमी लांबीच्या या मार्गावर स्वामी समर्थनगर, आदर्शनगर, जोगेश्वरी, जेव्हीएलआर, शामनगर, महाकाली गुंफा, सिप्झ गाव, साकी विहार, राम बाग, पवई तलाव, आयआयटी, कांजूरमार्ग आणि विक्रोळी (पूर्व द्रुतगती महामार्ग) अशी १३ स्थानके असणार आहेत.
...म्हणून टेंडर रद्द केले :
निविदा काढताना दक्षता आयुक्तांकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले नाही.
आंतरराष्ट्रीय खरेदी मानकांचे पालन करण्यात आले नाही.
निविदेत मूल्य अभियांत्रिकी, मालमत्ता बदली, जीवन खर्च मूल्यांकन संबंधित कलमांचा अंतर्भाव करण्यात आला नव्हता. करार व्यवस्थापनाचे मूलभूत पैलू जसे की, दस्तऐवज प्राधान्य देखभाल सुरक्षा आणि देयक अटी चुकीच्या होत्या.
७० टक्के काम पूर्ण :
आतापर्यंत या प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, ६ हजार ६७२ कोटी प्रकल्पासाठी खर्च करण्यात येणार आहे.
या मार्गावर चालविण्यात येणाऱ्या गाड्यांसाठी ‘एमएमआरडीए’ने जून २०२३ मध्ये निविदा काढली होती.
मात्र, त्यात बऱ्याच त्रुटी होत्या.
त्यामुळे ऑक्टोबर २०२३ मध्ये ही निविदा रद्द करण्याची वेळ ‘एमएमआरडीए’वर आली.
आता नव्याने निविदा काढली जाणार आहे.