परीक्षा आदल्यादिवशीच झाली, विद्यार्थ्यांची उडाली भंबेरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2023 10:06 AM2023-04-06T10:06:49+5:302023-04-06T10:07:03+5:30
परीक्षा विभागाचा गोंधळ संपेना, पालकांमध्ये संतापाचे वातावरण
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मंगळवारी म्हणजेच ४ एप्रिल रोजी महावीर जयंतीदिवशी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर गेले. पण, पेपर आदल्यादिवशीच झाल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांची पुरती भंबेरी उडाली, त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. इतका अभ्यास करूनही पेपर बुडाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सध्या मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) परीक्षा सुरू असून, ऐनवेळी परीक्षा केंद्रात बदल, सुटीच्या दिवशी परीक्षा असलेले वेळापत्रक मिळणे, सहाव्या सत्राच्या आधी पाचव्या सत्राचा निकाल जाहीर न होणे, अशा प्रकारांनी विद्यार्थी व पालक हैराण झाले आहेत.
विद्यार्थ्यांना परीक्षांचे संकेतस्थळावर हॉलतिकीट महिन्याभरापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी हे हॉलतिकीट डाऊनलोड करून परीक्षेची तयारी सुरू केली. मात्र याचदरम्यान आयडॉलकडून सुधारित हॉलतिकीट संकेतस्थळावर टाकले. यासंदर्भातील संदेशही त्यांच्या मोबाईलवर आयडॉलकडून पाठवण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र अनेकांना सुधारित हॉल तिकीट मिळालेच नाही आणि सुधारित हॉलतिकीटनुसार मंगळवारचा पेपर हा सोमवारी घेण्यात आल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकले आहेत. दरम्यान, आयडॉलच्या जुन्या आणि सुधारित हॉलतिकीटमुळे हा गोंधळ समोर आल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे म्हणणे काय ?
- तृतीय वर्ष बी. कॉम. सत्र ६ च्या परीक्षेचे हॉल तिकीट महाविद्यालयाच्या लॉगिनमध्ये पाठवले होते. १ एप्रिल २०२३ रोजी काही विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या विनंतीनुसार परीक्षा केंद्र बदलण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांचे सुधारित हॉल तिकीट महाविद्यालयाच्या लॉगिनमध्ये देण्यात आले होते.
- परंतु काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना सुधारित हॉल तिकीट न दिल्याने विद्यार्थी त्यांच्या जुन्या हॉल तिकीटनुसार परीक्षा केंद्रावर पोहोचले. त्यानंतर या परीक्षा केंद्रास विद्यापीठाने या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत निर्देश दिले आणि त्यानुसार या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या.
- जे विद्यार्थी उशिरा पोहोचले, त्यांना वेळ वाढवून देण्यात आली. सदर विद्यार्थ्यांना सुधारित हॉल तिकीट मिळाले असून, उद्यापासून ते त्यांच्या सुधारित परीक्षा केंद्रावर परीक्षा देतील. तसे निर्देश महाविद्यालयांना दिले आहेत.
पाचव्या सत्राचा निकाल नाही
- १५ एप्रिलपासून विद्यापीठाची तृतीय वर्ष कला शाखेची सत्र सहाची परीक्षा होऊ घातली आहे, परंतु या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा सत्र पाच परीक्षेचा निकाल जाहीर झाला नसल्यामुळे हे विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत. तरी पाचव्या सत्राचा निकाल त्वरित घोषित करावा, अशी मागणी विद्यार्थी करीत आहोत.
- परीक्षेपूर्वीच हॉल तिकीट द्या
- दरम्यान, या प्रकाराला कारणीभूत दोन महिने अगोदर अर्धवट परीक्षा प्रवेशपत्र (हॉलतिकीट) तयार करण्याची पद्धत बंद करावी आणि पूर्ण प्रवेशपत्र परीक्षेपूर्वी देण्याची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे काहीही बदल अपेक्षित असतील, तर विद्यार्थ्याला सर्व प्रकारच्या माध्यमांद्वारे कळविण्याची व्यवस्था करावी, अशी प्रतिक्रिया युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली.