लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आईची हत्या करून तिचे अवयव खाणे, हे कृत्य नरभक्षकाचे आहे. या घटनेने संपूर्ण समाज हादरला, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने मुलाला कोल्हापूर सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेवर मंगळवारी शिक्कामोर्तब केले.
सुनील कुचकोरवी याने २०१७ मध्ये केलेल्या या ‘क्रूर आणि रानटी’ गुन्ह्यासाठी त्याला कोल्हापूर सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा योग्यच आहे. त्याच्या सुधारणेची कोणतीही शक्यता नाही, असे निरीक्षण न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने आरोपीच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करताना नोंदवले.
आरोपीला दया नाही कुचकोरवी याला जन्मठेपेची शिक्षा दिल्यास तो तुरुंगातील अन्य कैद्यांसाठी संभाव्य धोका ठरू शकतो. निर्घृणपणे आईची हत्या करणारी व्यक्ती अन्य कोणाचीही हत्या करू शकतो. आरोपीला दया दाखवू शकत नाही. अशा माणसाला सोडल्यास त्याला पुन्हा एकदा समाजात तसाच गुन्हा करण्याचे स्वातंत्र्य दिल्यासारखे आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. निकाल देताना कुचकोरवी याला पुण्यातील येरवडा कारागृहातून उच्च न्यायालयाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले होते.
दारूसाठी पैसे न दिल्याने केली होती हत्या सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, २८ ऑगस्ट २०१७ रोजी कुचकोरवी याने त्याच्या ६३ वर्षीय आई यल्लमा कुचकोरवी हिची निघृणपणे हत्या केली. तिची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेहाचे अवयव काढून ते पॅनमध्ये तळले आणि खाल्ले. आईने मुलाला दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने आईची हत्या केली. २०२१ मध्ये कोल्हापूर सत्र न्यायालयाने कुचकोरवीला फाशीची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि कुचकोरवीनेही शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने त्याच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले.