Join us

लोकसभा निवडणुकीत जे उमेदवार उभे राहिलेत, त्यांच्या खर्चाचा तपासला जाणार हिशोब

By संतोष आंधळे | Published: May 10, 2024 10:10 PM

उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी वेळापत्रकानुसार विहित दिवशी व वेळेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले  आहे.

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लोकसभा निवडणूकीत जे उमेदवार उभे राहतात. त्यांचा खर्च निवडणूक आयोग तपासत असते. मुंबई  जिल्ह्यातील मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी वेळापत्रकानुसार विहित दिवशी व वेळेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी दि. ०९ मे रोजी झाली आहे.  निवडणूक आयोगाच्या निवडणूक खर्च  नियमावलीतील भाग बी १ व भारत निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार खर्च निरीक्षकांनी दैनंदिन खर्चाचा हिशोब तीन वेळा तपासावयाचा आहे. मुंबई दक्षिण मध्य' लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून रविंदर सिंधू यांची तरमुंबई दक्षिण' लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून मुकेश जैन काम बघत आहेत.

 दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या खर्च निरीक्षकांनी उमेदवारांचा खर्च तपासणीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. खर्च तपासणीसाठी उमेदवारांना १३ आणि  १९ मे रोजी  सह्याद्री अतिथीगृह दुपारी दोन वाजता उपस्थित राहावे लागणार आहे.उमेदवार किंवा प्रतिनिधींनी सर्व प्रकारच्या नोंदवह्या जसे की, दैनंदिन खर्च नोंदवही, रोख नोंदवही, बँक नोंदवही, संबंधित प्रमाणके (खर्चाच्या पावत्या), बँक पासबुक व इतर सर्व मूळ कागदपत्रांसह वरील नमूद ठिकाणी व दिनांकास विहीत वेळेत उपस्थित राहण्याबाबत जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

वरीलप्रमाणे नमूद दिनांकास उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांना ई-मेलव्दारेही लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या वेळापत्रकात काही अपरिहार्य कारणांमुळे बदल झाल्यास तसे दूरध्वनी किंवा ई-मेलने कळविण्यात येईल, असे मुंबई दक्षिण मध्य' लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे व मुंबई दक्षिण लोकसभा मंतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड यांनी सांगितले.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४मुंबईमतदान