दुष्काळाची व्याप्ती वाढणार; पाणी पातळी खालावली; छत्रपती संभाजीनगरमधील धरणे आटली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 09:20 AM2023-11-18T09:20:40+5:302023-11-18T09:20:53+5:30
मराठवाड्यातील धरणांत पाणीसाठा ३७ टक्क्यांवर, राज्यात ९३९ वाड्या, ३१६ गावांना टँकरने पाणीपुरवठा
मुंबई : राज्यात यंदा पावसाची तूट सरासरीच्या १४ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने अनेक भागांत स्थिती गंभीर झाली आहे. मराठवाड्याच्या धरणांतील पाणीसाठ्याची पातळी ३७ टक्क्यांपर्यंत खाली आली असून, राज्यात ९३९ वाड्या आणि ३१६ गावांना आतापासूनच टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. राज्यातल्या धरणांतील पाणीसाठाही मागील वर्षीच्या तुलनेत खाली आल्याने दुष्काळाची व्याप्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या १७८ तालुक्यातील ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत आणखी महसुली मंडळात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक वाड्या वस्त्यांत आतापासूनच पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील धरणे आटली
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या धरणाची संख्या ४४ आहे. या धरणातील पाणीसाठा ४३.५० टक्क्यांवर आला आहे. या जिल्ह्यातील मध्यम स्वरूपाच्या सुमारे ८१ धरणांमधील पाणीसाठा ३०.७ टक्क्यांवर आला आहे. लहान धरणांची संख्या ७९५ आहे, पण या सर्व धरणांमधील पाणीसाठा २६.२५ टक्क्यांवर आला आहे.