Join us  

जुहू किनाऱ्याचा चेहरा मोहरा बदलणार! नक्षीदार कमानी आणि आकर्षक दिवे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 9:33 AM

मुंबई :मुंबईकरांचे आकर्षण असलेल्या जुहू किनाऱ्याचा चेहरामोहरा लवकरच बदलणार आहे. नक्षीदार कमानी, आकर्षक दिवे, माशाच्या आकाराच्या कचरा पेट्या, ...

मुंबई :

मुंबईकरांचे आकर्षण असलेल्या जुहू किनाऱ्याचा चेहरामोहरा लवकरच बदलणार आहे. नक्षीदार कमानी, आकर्षक दिवे, माशाच्या आकाराच्या कचरा पेट्या, ग्राफिटी वॉल जुहू किनाऱ्यावर पाहायला मिळणार आहे. मुंबई सौंदर्यीकरण कामांतर्गत हा विकास केला जाणार असून, त्यासाठी पाच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याशिवाय प्लॅस्टिकमुक्त समुद्र ठेवण्यासाठी पालिकेकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

मुंबई महापालिकेने सौंदर्यीकरण प्रकल्प हाती घेतला असून, त्याअंतर्गत  रस्त्यांची दुरुस्ती, पदपथाचे सुशोभीकरण, भिंतींना रंगरंगोटी व इतर कामे केली जात आहेत. या कामांसाठी १ हजार ७२९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, प्रत्येक प्रभागासाठी ३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत जुहू किनाऱ्याचा कायापालट करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

१०० पोल ना एलईडी लाइट्स, पदपथांना फ्लोर मेटिंग लाइट, समुद्र किनाऱ्यावर ग्राफिटी वॉल तयार केली जाणार आहे. याशिवाय  वक्राकार आणि नक्षीदार कमानी, माशाचा आकार असलेली कचरा पेटी, होलोग्राम दिव्याचे खांब उभारले जाणार आहेत.

भरती, ओहोटीची उद्घोषणा  जुहू किनाऱ्यावर दररोज मुंबईकर फेरफटका मारण्यासाठी येतात.   याशिवाय इतर राज्यांतून तसेच परदेशातूनही पर्यटक जुहू चौपाटी पाहायला येतात.   मात्र पर्यटकांकडून समुद्रात उतरण्याचे प्रकार घडत असतात.   त्यामुळे पर्यटकांना सजग करण्यासाठी भरती, ओहोटीची उद्घोषणा करण्यासाठी सोय केली जाणार आहे.   येथील लहान होड्यांना एलईडी लाइटने सजविण्यात येणार आहे.