मराठा आंदोलनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही, नोकऱ्या देणार; CM शिंदे यांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 12:19 PM2024-01-27T12:19:19+5:302024-01-27T12:20:23+5:30
यावेळी, जे लोक आंदोलनात मृत्यूमुखी पडले, त्यांच्या कुटुंबीयांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना आपण नोकऱ्या देणार आहोत, अशी घोषणाही मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आंदोलकांना मोठे यश मिळाले आहे. राज्यातील युती सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. म्हत्वाचे म्हणजे, यात 'सगे-सोयरे' मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात अध्यादेशही काढण्यात आला आहे. यानंतर आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील वाशी येथे पोहोचून, मनोज जरांगे यांना ज्यूस पाजत त्यांचे उपोषण सोडवले आणि उपस्थित आंदोलकांना संबोधित केले. यावेळी, जे लोक आंदोलनात मृत्यूमुखी पडले, त्यांच्या कुटुंबीयांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना आपण नोकऱ्या देणार आहोत, अशी घोषणाही मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
शिंदे म्हणाले, "एक मलाराठा लाख मराठा आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. यामुळे तुम्ही आंदोलनाच्या माध्यमाने ज्या-ज्या मागण्या केल्या, मग सारथी असेल, अन्नासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, या सर्वांना न्याय देण्याचे काम आपण या ठिकानी करू. तसेच जे लोक आंदोलनात मृत्यूमुखी पडले, त्यांच्या कुटुंबीयांनाही आपण वाऱ्यावर सोडणार नाही. आपण कर्तव्य म्हणून त्या 80 लोकांना 10 लाख रुपयांप्रमाणे मदत दिली आहे. नोकऱ्याही देणार आहोत."
"हे सरकार तुमचे सर्वसामान्यांचे सरकार" -
"हे सरकार तुमचे सर्वसामान्यांचे सरकार आहे. या सरकारने जे काही निर्णय घेतले आहेत, यात गुन्हे मागे घेण्याचे असतील, इतरही काही निर्णय असतील. त्याची पूर्ण अंमलबजावणी सरकार करेल, असा शब्द मी तुम्हाला देतो आणि पुम्हा एकदा मनोज जरांके पाटील यांचे अभिनंदन करतो." असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
"...म्हणूनच मी छत्रपती शिवाजी महारांजांच्या पुतळ्याला साक्षी मानून शपथ घेतली होती" -
"मी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. त्यामुळे, मला आपल्या सर्वांच्या कष्टाची आणि परिस्थितीची जाणीव आहे. म्हणूनच मी छत्रपती शिवाजी महारांजांच्या पुतळ्याला साक्षी मानून शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण करण्याचे काम हा एकनाथ शिंदे करत आहे. दिलेला शब्द पाळणे हीच माझी कार्यपद्धती, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले.