- मनीषा म्हात्रे मुंबई - मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. गुन्हे शाखेने शर्तीने प्रयत्न करत अल्पवयीन मुलीचा शोध घेतला. चौकशीत गेल्या पाच वर्षापासून वडिलांकडून सुरु असलेल्या लैगिक अत्याचाराला कंटाळून पळून गेल्याचे पोलिसांना सांगून मुलीने हंबरडा फोडला. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत विकृत ४६ वर्षीय वडिलांना अटक केली आहे.
गुन्हे शाखेच्या कक्ष ३ चे प्रभारीवरिष्ठ पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी समीर मुजावर, राणे, गोरेगावकर, अंमलदार घाटकर, परब, जगताप, चव्हाण, ठाकुर, हर्षला पाटील यांनी ही कारवाई केली आहे. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, ताडदेव परिसरात १७ वर्षीय मुलगी आई, वडिलांसोबत राहते. २ ऑकटोबर रोजी ती अचानक गायब झाल्याने कुटुंबीयांनी मुलीचा शोध घेतला. ४६ वर्षीय वडिलाने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. ताडदेव पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवत मुलीचा शोध सुरु केला. दुसरीकडे गुन्हे शाखेच्या कक्ष ३ ने देखील समांतर तपास सुरु केला.
तपासादरम्यान १७ वर्षीय मुलगी महालक्ष्मी रेल्वे स्थानकात मिळून आली. पोलिसांनी तिला विश्वासात घेत चौकशी करताच मुलीने हंबरडा फोडून वडिलांच्या अत्याचाराबाबत पोलिसांना सांगितले. २०१९ पासून ते २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत वडिलांकडून तिच्यावर लैगिक अत्याचार सुरु होते. याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवेठार मारण्याची धमकी देण्यात येत होती. वडिलांच्या अत्याचाराला कंटाळून तिने अखेर घर सोडल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार, पुढील तपासासाठी तिला ताडदेव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ताडदेव पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून वडिलांविरुद्ध पोक्सो, लैगिक अत्याचाराचा बुधवारी गुन्हा नोंदवला. याप्रकरणात गुन्हे शाखेने तिचे विकृत वडिलाला सात रस्ता परिसरातून अटक केली आहे.