'आधीच्या काही गोष्टींची पुनरावृत्ती करु नका'; दिल्लीतून कडक समज दिल्याची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 06:32 AM2022-08-10T06:32:36+5:302022-08-10T06:32:43+5:30
आज समावेश करण्यात आलेल्या मंत्र्यांमध्ये अर्थातच फडणवीस समर्थकांचा भरणा आहे.
मुंबई : गुजरात पॅटर्न आणत भाजपकडून मंत्रिमंडळ विस्तारात नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, ही आशा फोल ठरली. हा पॅटर्न आणण्याचा निर्णय सुरुवातीला दिल्लीच्या पातळीवर आधी झाला होता, पण राज्यातील बड्या नेत्यांनी श्रेष्ठींकडे हट्ट धरत तो हाणून पाडल्याचे चित्र विस्तारानंतर समोर आले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाजपचे राज्यातील मंत्री निश्चित करताना गुजरात पॅटर्न आणण्याचे सूतोवाच जुलैच्या पहिल्या आठवड्यात केले. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी, राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याकडे निरोप दिला गेला. या दोघांनी तो राज्यातील कर्त्याधर्त्या दोघांपर्यंत पोहोचविला आणि खळबळ उडाली.
गुजरात पॅटर्न येणार ही भीती पसरली आणि ती घालविण्यासाठी मग दिल्लीत लॉबिंग सुरू झाले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन यांनी गेल्या आठ दिवसांत दिल्ली गाठून हट्ट धरला आणि स्वत:सह ज्येष्ठांचा बचाव केला, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. दिल्लीने आधीच्या काही गोष्टींची पुनरावृत्ती न करण्याची कडक समज दिली, असेही समजते.
आज ज्यांचा शपथविधी झाला त्यांच्यातील तिघांऐवजी डॉ. संजय कुटे, प्रवीण दरेकर आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची नावे होती, पण ती कापण्यात लॉबिंग करणाऱ्यांना यश आले. फडणवीस यांनी सगळ्याच अनुभवी लोकांना वगळण्यास विरोध केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत, पावणेदोन वर्षांत लोकसभेची तर सव्वादोन वर्षांत विधानसभेची निवडणूक आहे, त्यामुळे अनुभवी चेहरे लागतीलच, अशी भूमिका त्यांनी वर मांडली. दुसऱ्या टप्प्यात मात्र ते आता संधी हुकलेले दिग्गज आणि नवीन चेहरे असा मेळ साधला जाईल. आज समावेश करण्यात आलेल्या मंत्र्यांमध्ये अर्थातच फडणवीस समर्थकांचा भरणा आहे.