मुंबईकरांच्या डोक्याला साथराेगांचा ‘ताप’; रुग्णांची आकडेवारी जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 12:18 PM2023-09-27T12:18:10+5:302023-09-27T12:19:42+5:30
महानगरपालिकेने जारी केली रुग्णांची आकडेवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पावसाळी आजाराची रुग्णसंख्या कमी होत असली तरी डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने पावसाळी आजारांच्या रुग्णांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये गेल्या महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे रुग्ण ६८५, तर सप्टेंबरमध्ये या आजाराचे रुग्ण ९९९ असल्याची आकडेवारी नमूद करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे डासांपासून होणाऱ्या आजारांत वाढ होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यामध्ये मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण अधिक आहेत. हिपॅटायटिस आणि गॅस्ट्रोची रुग्णसंख्या बऱ्यापैकी कमी झाली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत स्वाइन फ्लूचे रुग्ण या महिन्यात कमी प्रमाणात आढळून आल्याचे आकडेवारीवरून समाेर आले आहे.
‘एडिस’मुळे पसरताेय डेंग्यू
डेंग्यू हा डासांच्या माध्यमातून होणारा विषाणुजन्य आजार आहे. एडिस इजिप्ती या प्रजाती डेंग्यू पसरविण्यास कारणीभूत ठरत असतात. या आजरात तापामुळे काही जणांना हाडं आणि स्नायूंत खूप वेदना जाणवत असतात. त्यासोबत डोकेदुखी, मळमळ, अंगावर लाल पुरळ येणं अशी लक्षणं दिसू शकतात. या आजरात रुग्णाला त्याची लक्षणे पाहून औषधं दिली जातात. जर रुग्णाची प्रकृती गंभीर असेल, तर त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागू शकते.