मुंबई : मंत्रालयातील अत्याधुनिक स्टुडिओची फाइल गहाळ झाल्याने खळबळ उडाली आहे. या फाइलमध्ये शासनाला पाठवलेला प्रस्ताव, शासनमान्यता, टेंडर प्रक्रियेचा समावेश होता. या प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
नाशिकचे रहिवासी ज्ञानोबा नारायण इंगवे (५७) हे नाशिकच्या विभागीय माहिती कार्यालय, माहिती व जनसंपर्क महासंचलनालय कार्यालयात उपसंचालक या पदावर सप्टेंबर २०२१ पासून कार्यरत आहेत. तत्पूर्वी ते माहिती व जनसंपर्क महासंचलनालय, मुंबई कार्यालयात जुलै २०१५ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत वरिष्ठ सहायक संचालक पदावर कार्यरत होते.
मंत्रालयाच्या तळमजल्यावर शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी करण्यासाठी तयार करण्याच्या चित्रफिती, तसेच मंत्री व सनदी अधिकारी यांच्या मुलाखतीचे चित्रीकरण करण्यासाठी २०१५ मध्ये अत्याधुनिक स्टुडिओची निर्मिती करण्यात आली होती. या स्टुडिओची शासनाकडून मान्यता घेण्यापासून ते उभारणी करण्यापर्यंतची सर्व कागदपत्रे (शासनाला पाठवलेला प्रस्ताव, शासनमान्यता, टेंडर प्रक्रिया इत्यादी ) स्टुडिओचे अद्ययावतीकरण याची फाइल या संबंधित नावाने असलेल्या फाइलमध्ये लावण्यात आली होती.
२०१९-२० मध्ये कार्यालयातील कागदपत्रांचे वर्गीकरण करत असताना स्टुडिओच्या अद्ययावतीकरणाची फाइल दिसून आली नाही. याबाबत कार्यालयातील अधीक्षक प्रभु कदम यांच्यासह लिपिकानी मिळून शोध घेतला मात्र फाइल सापडलीच नाही. अत्याधुनिक स्टुडिओ उभारणीची फाइल डिसेंबर २०१८ पर्यत कार्यालयाचे अभिलेखावर होती. ती अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. या फाइलचा कुणाला व कसा फायदा होणार होता, या दिशेने पोलिस अधिक तपास करत आहेत. तक्रारदार ज्ञानोबा इंगवे यांच्याकडे याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा दखल झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.