Lokmat Sur Jyotsna Music Award : लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मी जीवनात बरेच चढ-उतार पाहिले असले तरी ‘जिंदगी ग्रँड होके देखनी चाहीए’ असेच म्हणेन. मला अनेक बुद्धिवान लोकांनी, समीक्षकांनी पुरस्कार दिले. मात्र, माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी दिलेला हा पहिला पुरस्कार आहे, अशा शब्दांत प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. निमित्त होते ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार, २०२५’ वितरण सोहळ्याचे...
‘लोकमत सखी’च्या संस्थापक आणि संगीत साधक ज्योत्स्ना विजय दर्डा यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदा या सोहळ्याचे १२ वे पर्व आहे. येथील एनसीपीएमधील टाटा थिएटरमध्ये कलाकार आणि संगीतप्रेमींच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा थाटात झाला. ज्येष्ठ गीतकार-पटकथा लेखक जावेद अख्तर यांना लीजेंड अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. संगीत क्षेत्रातील अनमोल योगदानाबद्दल ज्येष्ठ गायक नितीन मुकेश यांना आयकॅान अवॅार्डने सन्मानित करण्यात आले. आता जीवनाचा रस्ता छोटा आणि कामाचा डोंगर खूप मोठा वाटतो, अशी मनातली भावनाही जावेद अख्तर यांनी बोलून दाखवली. अशा प्रकारचे सोहळे आयोजित करणाऱ्या विजय दर्डा यांना ज्योत्स्ना यांनी किती प्रेम दिले असेल,. त्यामुळेच मला प्रत्येक मुलात विजय आणि प्रत्येक मुलीमध्ये ज्योत्स्ना पाहायला आवडेल असेही ते म्हणाले, तेव्हा सभागृह टाळ्यांनी दणाणून गेले.
वडिलांच्या स्मृतींचा हा सन्मान आहे!
नितीन मुकेश म्हणाले की, आज आनंदाने जीभ लडखडली, तर मला माफ करा. या पुरस्काराबद्दल डॉ. विजय दर्डा यांचा आभारी आहे. माझ्या वडिलांच्या म्हणजेच मुकेशजींच्या स्मृतींचा हा सन्मान आहे. पुरस्कारामुळे ‘लोकमत’शी मी कायम जोडलेला राहीन. नील आणि नमन या माझ्या मुलांनाही हा पुरस्कार प्राप्त होवो.
यंदा सहा ठिकाणी सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकमत सूर ज्योत्स्ना नॅशनल म्युझिक अवॉर्डस २०२५’ सोहळ्यात रसिकांनी सूफी जॅझ संगीताचा संगम अनुभवला. गजल गायिका पूजा गायतोंडे आणि संगीतकार लुईस बँक्सच्या संगीताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ड्रम्सवर गिनो बँक्स, बासवर शेल्डन डिसिल्व्हा, ट्रम्पेटवर हर्ष भावसार, गिटारवर जयंत गोशर आणि तबल्यावर उन्मेश बॅनर्जी यांनी साथ केली. सेलो पुरस्कृत व अदानी समूह आणि सॅालिटेअर समूह या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते. सूर ज्योत्स्ना गीत जावेद अख्तर यांनी लिहिले आहे, ते ही या साेहळ्यात दाखवण्यात आले.
सुमधुर गीतांनी सोहळ्याला चार चाँद
एक प्यार का नगमा है..., आ अब लौट चले... आणि सो गया ये जहाँ... ही गाणी आपल्या सुमधुर आवाजात गात नितीन मुकेश यांनी या सोहळ्याला वेगळीच रंगत आणली. कोणत्याही संगीताची साथसंगत न घेता नितीन मुकेश यांनी आपल्या आवाजाने सारे सभागृह भारून टाकले. त्यांच्या प्रत्येक गाण्याला मिळणारी टाळ्यांची दाद थांबतच नव्हती. प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे करणारा हा क्षण संपूच नये असे अवघ्या सभागृहाला वाटत होते.
मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विजय दर्डा, माजी मंत्री सुरेशदादा जैन, गायक रूपकुमार राठोड, अभिनेता नील नितीन मुकेश, लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, सहव्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा आदींची उपस्थिती होती.