उपनगरातील पहिल्या वाहिल्या दिव्यांग उद्यानाचे होणार लोकार्पण
By मनोहर कुंभेजकर | Published: March 13, 2024 03:40 PM2024-03-13T15:40:21+5:302024-03-13T15:41:00+5:30
आमदार अतुल भातखळकर यांची संकल्पना
मुंबई - मुंबई उपनगरात पहिल्यांदाच कांदिवली पूर्व मध्ये साकारलेल्या “दिव्यांग उद्यान”चे लोकार्पण गुरुवार,दि. 14 रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. कांदिवली पूर्व विधानसभेतील अशोक चक्रवर्ती मार्ग येथे हे उद्यान साकारण्यात आले आहे.
समाजातील जो दिव्यांग घटक आहे त्यांची काळजी घेत त्यांच्या विरंगुळ्याची तसेच त्यांचा मानसिक, शारीरिक असा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या उद्यानाची निर्मिती केली आहे. भाजप नेते आणि कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांच्या संकल्पनेतून आणि निधीतून या उद्यानाची निर्मिती झाली आहे.
या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ पूर्णभान आचार्य डॉ. राजेंद्र बर्वे, सोपानच्या ट्रस्टी डॉ. रुबीना शंकर लाल उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी ज्यांना दोन वेळचे अन्न मिळणे कठीण आहे अशा गरजूंना अन्न मिळावे यासाठी “रोटी बँक” सुरू केली आहे. आज सकाळ, संध्याकाळ रोज तेथे लोकांना पुरेसे अन्न उपलब्ध करून देण्यात येते. महिला स्वावलंबी व्हाव्यात, कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा या उद्देशाने त्यांना महिला आधार भवनमध्ये विविध प्रकारच्या कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाते. मुंबई बाहेरून जे कॅन्सर रुग्ण येथे उपचारासाठी येतात त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. गोपीनाथ मुंडे उद्यानाच्या माध्यमातून मुलांना उत्तम दर्जाचे स्केटींग प्रशिक्षण दिले जाते, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असे अनेक प्रकल्प कांदिवली पूर्व विधानसभेत राबवले आहेत
अशी माहिती आमदार भातखळकर यांनी दिली.