मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतचा कोस्टल रोडचा पहिला टप्पा पुढील महिन्यात सुरु होणार आहे. याचबरोबर शिवडी ते नाव्हाशेवा हा 22 किमीचा रस्ताही पुढील महिन्यात सुरु होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले.
सीएसआर एक्सलन्स अवॉर्डस् सोहळ्यामध्ये ते बोलत होते. यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ‘दि सीएसआर जर्नल चॅम्पीयन ऑफ गुड गव्हर्नन्स’ हा पुरस्कार देण्यात आला. खासदार श्रीकांत शिंदे यांना सी एस आर जर्नल पुरस्कार देण्यात आला. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात अभिनेत्री भूमी पेडणेकर, युवराज सिंग आणि पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे व स्मिता कोल्हे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी शिंदे यांनी राजनाथ सिंहांना श्रीकांत शिंदेंच्या प्रचाराला कल्याणमध्ये आला होता, अशी आठवण करून दिली. याचबरोबर मुनगंटीवार यांना तेव्हाच्या राजकीय परिस्थितीमुळे विधानसभा निवडणुकीत विरोधात प्रचार करायला आलेला, असा चिमटाही काढला. तसेच श्रीकांत शिंदे हे पहिल्यांदाच उभे राहिलेले तेव्हा त्यांना माझा मुलगा म्हणून ओळखले जात होते. आता त्यांच्या कामामुळे त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. बाप म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
पहिले आम्ही दोघेजण होतो, मी आणि फडणवीस. पहिल्या कॅबिनेट ते आताच्या कॅबिनेटपर्यंत जेवढे निर्णय घेतले ते सामान्य लोकांच्या हितासाठी घेतले आहेत. तुम्ही नाव नाही घेतले, परंतू बरोबर बोललात. मोदींनी जगात देशाचे नाव झळकविले आहे. पाचवी अर्थव्यवस्था बनविली आहे, आता ती तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे काम करणार आहोत. आपण एकत्र हे काम करू याचा विश्वास देतो. मागच्या राजकारणात तुम्हाला चांगला अनुभव आहे की नाही माहिती नाही, परंतू आता आपण चांगले काम करू, असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता लगावला.