Join us

मीरा-भाईंदरमध्ये साकारणार राज्यातील पहिले संगीत गुरुकुल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 7:13 AM

मुंबईला लागून असल्याने मीरा-भाईंदर शहरात कलाकार, संगीत व कलाप्रेमी यांचे वास्तव्य मोठ्या संख्येने आहे

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : राज्यातील पहिले संगीत गुरुकुल गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने मीरा-भाईंदर शहरात उभारले जाणार आहे. २५ कोटी खर्चून होणाऱ्या या संगीत विद्यालयाचे भूमिपूजन बुधवार, २७ सप्टेंबरला होणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. या संगीत विद्यालयामुळे शहराचा वेगळा नावलौकिक होऊन नवोदित गायकांना व संगीतप्रेमींना चांगली संधी मिळणार असल्याचे ते म्हणाले. 

मुंबईला लागून असल्याने मीरा-भाईंदर शहरात कलाकार, संगीत व कलाप्रेमी यांचे वास्तव्य मोठ्या संख्येने आहे. संगीत विद्यालयामुळे या शहराला नवी ओळख मिळणार आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृती कायम जपल्या जाव्यात यासाठी त्यांच्या नावे मीरा-भाईंदर शहरात संगीत गुरुकुल उभारण्याची संकल्पना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली होती. मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावास मान्यता देत संगीत गुरुकुल उभारण्यासाठी २५ कोटी रुपये निधी मंजूर केला होता. 

    मीरा रोडच्या पालिका आरक्षण क्रमांक २४६ येथे हे संगीत गुरुकुल उभारले जाणार आहे.     या संगीत गुरुकुलाची इमारतसुद्धा संगीत क्षेत्राला शोभेल अशा पद्धतीने तयार होणार आहे.    या कामाची निविदा प्रक्रिया पालिकेकडून पूर्ण झाली असून या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत.

संगीत विद्येचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम येथे शिकवला जाईल. मुंबई विद्यापीठाच्या संगीत विद्यापीठाशी हे संगीत गुरुकुल संलग्न करण्याचा प्रयत्न केला जाईल. जेणेकरून मीरा भाईंदरमध्येच संगीत पदवी मिळू शकेल, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. -  प्रताप सरनाईक, आमदार

मंगेशकर कुटुंबीयांची असणार विशेष उपस्थिती २८ सप्टेंबर हा लता मंगेशकर यांचा जन्मदिवस आहे. त्याच्या एक दिवस आधी बुधवार २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता या संगीत विद्यालय उभारणीचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. या सोहळ्याला ज्येष्ठ गायिका मीनाताई खडीकर, उषा मंगेशकर व मंगेशकर कुटुंबीयांची विशेष उपस्थिती असणार आहे. यावेळी लता मंगेशकर नाट्यगृहात ‘लतायुग’ हा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

टॅग्स :लता मंगेशकरबॉलिवूड