Join us  

पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा विरोधी पक्षनेत्याशिवाय विरोधक दिशाहीनच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 6:27 AM

पुढच्या आठवड्यात हे पद भरले जाणार का? याची प्रतीक्षा आहे.

मुंबई : अधिवेशनाचा पहिला आठवडा सरला तरी विरोधी पक्षनेता देण्यात काँग्रेसला आलेले अपयश आणि त्यामुळे दिशाहीन असलेला विरोधी पक्ष, असे चित्र विधानसभेत दिसले. पुढच्या आठवड्यात हे पद भरले जाणार का? याची प्रतीक्षा आहे. 

शिवसेनेपाठोपाठ (उद्धव ठाकरे) राष्ट्रवादीतील फाटाफुटीने तसेही विरोधक उत्साहित आहेत. राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) बाकांवर निराशा स्पष्ट दिसते. एकत्रित असताना राष्ट्रवादीचा आवाज बुलंद होता. अजित पवार, वळसे पाटील, जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ हे जोरदार किल्ला लढवायचे. मात्र आता उतरती कळा लागली आहे. 

जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड पहिल्या आठवड्यात तीन-चार वेळा बोलले. रोहित पवार यांनी विषयांची चांगली मांडणी केली. यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे यांनी आक्रमकता दाखवली.

सत्तापक्षाची कोंडी करण्यात अपयश

महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये समन्वय राखून सत्तापक्षाची कोंडी करण्याची कोणतीही रणनीती पहिल्या आठवड्यात दिसली नाही. एखाद्या मुद्यावर काँग्रेससोबत इतर दोन पक्ष तेवढ्याच त्वेषाने एकवटल्याचेही दिसले नाही. सभात्यागापुरती मात्र त्यांनी सोबत केली.

‘ती’ संधीही गमावली...

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओवरून सभागृहात रणकंदन माजविण्याची संधी विरोधी पक्षांनी गमावली. एक शब्दही त्यावर कोणी बोलले नाही. सत्तापक्षाला तेच हवे होते. आदित्य ठाकरे बाहेर हल्लाबोल करतात; पण सभागृहात ते रूप अद्याप दिसले नाही. येत्या आठवड्यात काय होतंय ते दिसलेच.

...पण थोडी पंचाईतही झाली

मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्याकडील खाती अधिवेशनापुरती सहकारी मंत्र्यांना देणे आणि त्या मंत्र्यांच्या संबंधित विषयावर असलेली अपुरी तयारी यामुळे काहीवेळा नक्कीच पंचाईत झाली. प्रश्न पुढे ढकलण्याचाही प्रसंग आला. ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर आपल्याला बोलण्याची संधी देत नाहीत, असा आरोप केला होता. पण जाधव यांना गेल्या दोन अधिवेशनांमध्ये किती मिनिटे बोलण्याची संधी दिली, याची आकडेवारी देत नार्वेकर यांनी आरसा दाखवला.

सत्तापक्षातील समन्वय अचूक

दुसरीकडे सत्तापक्ष मजबूत आहे. २०० पेक्षा अधिक संख्याबळ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री, अनेक अनुभवी मंत्री अशी मजबूत फळी दिसत आहे. इर्शाळगडाच्या दुर्घटनेनंतर तिघांनी वाटून घेतलेल्या जबाबदाऱ्यांमधून तिघांमधील समन्वय अचूक असल्याचे दिसले.

टॅग्स :विधान भवन