Join us  

आमदारांच्या निवासासाठी उभे राहतेय पंचतारांकित ‘दि मॅजेस्टिक’; ७२ डिलक्स रूम, मल्टिक्युझिन रेस्टॉरंट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 6:18 AM

दीड वर्षात नूतनीकरण

मुंबई : मनोरा आमदार निवास कधी उभे राहणार, हा आमदारांसमोर प्रश्न असतानाच आता मॅजेस्टिक आमदार निवासाचेही नूतनीकरण हाती घेण्यात आले आहे. १८ महिन्यांत या आमदार निवासाचा कायापालट होऊन जागतिक दर्जाच्या सुविधा येथे उभारल्या जातील. डिलक्स, सुपर डिलक्स रूमसह हे आमदार निवास आमदारांच्या सेवेत रूजू होणार आहे. 

आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी तीन आमदार निवासे आहेत. त्यापैकी मनोरा निवास पाडून चार वर्षे लोटली तरी ते प्रत्यक्षात कधी उभे राहणार, हा प्रश्न आहे. सध्या तिथे राहणाऱ्या आमदारांना मुंबईत भाड्याने राहण्यासाठी सरकारकडून भाडेही मोजले जात आहे. त्यापाठोपाठ आता मॅजेस्टिक आमदार निवासाचेही नूतनीकरण करण्यात येत आहे. हेरिटेज वास्तू असल्याने तिचा वारसा जपून त्यात मोठे बदल केले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी या कामाचा शुभारंभ करण्यात आला. तर मनोराचा मात्र पायाही रचण्यात आलेला नाही. येत्या काळात या आमदार निवासाचे काम सुरू होईल, असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

असा होणार कायापालट

  • नवीन आराखड्यानुसार तळमजल्यावर भव्य प्रवेशद्वार, स्वागत कक्ष, जेवण, कॉफी शॉप, मल्टिक्युझिन रेस्टॉरंट असेल. 
  • पहिल्या मजल्यावर दिव्यांग अतिथींसाठी युनिव्हर्सल सूट, ७२ डिलक्स, सुपर डिलक्स अतिथी खोल्या, सूट प्रस्तावित आहेत. 
  • दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर कार्यालये, चौथ्या मजल्यावर प्रेसिडेंशियल सूट, गच्चीवर बँक्वेट हॉल, तळघरात कर्मचाऱ्यांसाठी खोल्या प्रस्तावित आहेत.
टॅग्स :महाराष्ट्र सरकारमुंबईहॉटेल