अडीच कोटी मुंबईकरांची अन्नसुरक्षा वाऱ्यावर! कोट्यवधींच्या मुंबईत केवळ तेरा अन्न सुरक्षा अधिकारी
By स्नेहा मोरे | Published: September 16, 2023 07:01 PM2023-09-16T19:01:25+5:302023-09-16T19:04:06+5:30
वांद्रे येथील हाॅटेलमध्ये खाद्यपदार्थांत मेलेला उंदीर आढळल्यानंतर राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने शहर उपनगरातील हाॅटेल्सची झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत सुमारे तीस हजारांच्या घरात छोटी मोठी हाॅटेल्स आहेत. या हाॅटेलची झाडाझडती मोहीम सध्या अन्न व औषध प्रशासनाने हाती घेतली आहे. मात्र, मुंबईत केवळ १३ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांवर ही तपासणी करण्याची मदार आहे. एकाच वेळी खाद्यपदार्थांच्या सुरक्षासंदर्भातील अनेक कामे रडारवर असताना अडीच कोटी मुंबईकरांच्या अन्न सुरक्षेची जबाबदारी कशी पार पाडणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.
वांद्रे येथील हाॅटेलमध्ये खाद्यपदार्थांत मेलेला उंदीर आढळल्यानंतर राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने शहर उपनगरातील हाॅटेल्सची झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत प्रशासनाचे १३ अन्न सुरक्षा अधिकारी दिवसाला मुंबईतील केवळ चार ते पाच हाॅटेल्समध्ये ही तपासणी करत आहेत. मागील काही वर्षांपासून अन्न व औषध प्रशासनात मनुष्यबळाची कमतरता असल्याने येथील अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे कमी अधिकाऱ्यांमध्ये फेरीवाले, हॉटेल्स, प्रतिबंधित खाद्य पदार्थांवरील कारवाई, दुग्ध उत्पादन कारवाई आणि अन्य तपासणी कशी करणार, हा यक्ष प्रश्न आहे.
...तर २० वर्षे लागतील मुंबई पालथी घालायला
एफडीएचे १३ अन्न सुरक्षा अधिकारी दिवसाला चार हॉटेल्स तपासतात. मुंबईतील सप्ततारांकित, पंचतारांकित आणि अन्य छोटी - मोठी हॉटेल्स मिळून साधारण तीस हजारांच्या घरात हॉटेल्स आहेत. म्हणजेच इतकी हॉटेल्स तपासण्यासाठी ७ हजार ५०० दिवस लागतील. याचाच अर्थ संपूर्ण मुंबईतील हॉटेल्स तपासण्यासाठी एफडीएच्या टीमला सुमारे वीस वर्षे लागतील.
कायदा काय सांगतो?
सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कठोर कायदे केले आहेत. या कायद्याची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न शाखेकडून केली जाते. जुन्या अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार एक लाख लोकसंख्येमागे एक अन्न सुरक्षा अधिकारी असा निकष आहे. कायदा बदलल्यावर एक हजार नोंदणीकृत व्यावसायिकांमागे एक अन्न व सुरक्षा अधिकारी असा निकष ठरला आहे.
मुंबईत आहार असोसिएशनकडे नोंद असलेले सुमारे आठ हजार सदस्य - व्यावसायिक आहेत. यात रेस्टॉरंट, हाॅटेल्स, खोली असलेले हॉटेल्स आणि बारचा समावेश आहे. याखेरीस, मुंबईत फाइव्ह आणि सेव्हन स्टार असलेले सुमारे दहा हॉटेल्स आहेत. त्याचप्रमाणे एकूण छोटी - मोठी हॉटेल्स मिळून ही संख्या जवळपास ३० हजारांच्या घरात आहे.
- प्रमोद कामथ, आहार असोसिएशन
सध्या आमच्याकडे असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मुंबईतील हॉटेल्सची तपासणी वेगाने सुरू आहे. शिवाय, सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिठाईसंदर्भातही काम करत आहोत. एफडीएकडे सध्या मनुष्यबळाची कमतरता आहे. मात्र, लवकरच याची पूर्तता केली जाईल, याविषयी वरिष्ठ पातळीवर प्रक्रिया सुरू आहे.
- शैलेश आढाव, सहआयुक्त अन्न, अन्न व औषध प्रशासन विभाग
मुंबईत एकाच अन्न सुरक्षा अधिकाऱ्याकडे जास्त विभागाची जबाबदारी मिळते. त्यातून या अधिकाऱ्यांना कमिशन मिळते. त्यामुळे कायमच अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मनुष्यबळ कमी असल्याचे सांगितले जाते. मात्र, दुसऱ्या बाजुला भरती न करता त्याआडून हप्ते वसूल करण्याचे प्रकार सुरू आहेत. यापूर्वी, मुंबईचा आवाका पाहून विभागातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची पूर्तता करण्यात आली होती. त्या सूचनेला मॅटनेही सकारात्कमता दर्शविली होती.
- महेश झगडे, माजी आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग