मुंबई- आरे युनिट क्रमांक १५ जवळ दि,२६ रोजी सकाळी ६.३० येथे लावलेल्या पिंजऱ्यात नरभक्षक बिबट्याला पकडण्यात यश आले होते. तर आज सकाळी ६ वाजता युनिट क्रमांक १५ येथील ज्या ठिकाणी याआधीच बिबट्या पकडण्यात आला होता त्याच ठिकाणी हा दुसरा बिबट्या पकडण्यात आला आहे. वनखात्याने येथे लावलेल्या पिंजऱ्याच्या सापळ्यात बिबट्या पकडला गेला.
जोगेश्वरीचे स्थानिक आमदार व माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी बिबट्या पकडल्याची माहिती मिळताच प्रथम या शुभवर्तमानाची लोकमतला माहिती दिली. नरभक्षक बिबट्याला तात्काळ पकडण्याच्या वनविभागाच्या अधिकार्यांना वायकर यांनी सूचना दिल्या होत्या आणि दि,२६ रोजी दिवाळीत बिबट्या पकडला गेला. तर आज सकाळी पकडलेला दुसरा बिबट्या हा नर बिबट्या आहे. मात्र इतिकावर हल्ला करणारा हाच तो बिबट्या आहे का याचा वनविभाग शोध घेत आहे असे त्यांनी सांगितले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,आरे कॉलनीमधील वस्त्या, पाड्यांवर बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. अधूनमधून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनाही घडत असतात. गेल्या सोमवारी दिवाळीत सकाळी ६.३० च्या सुमारास आरे दुग्ध वसाहतीतील युनिट क्रमांक १५ मध्ये वास्तव्यास असलेले अखिलेश लोट यांची दीड वर्षाची मुलगी इतिका गायब झाली होती. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याच्या घटनांमुळे आरेतील विविध पाड्यांमधील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.आज दुसरा बिबट्या पकडल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असला तरी अजून आरेत बिबट्याची दहशत असल्याचे येथील नागरिकांनी लोकमतला सांगितले.
दरम्यान काल मृत इतिकाच्या कुटुंबाला शासनाने वीस लाखांची आर्थिक मदत केली होती,पण मृत इतिकाचा गेलेला जीव परत येणार का असा सवाल डॉ.रामेश्वरी पाटील यांनी केला.