Join us  

Rajya Sabha Election 2022: महाविकास आघाडीकडे बहुमत; आमचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होणार- जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 3:16 PM

महाविकास आघाडीच्या बैठकीआधी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुंबई- सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जवळ येत असताना सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपच्या गोटातील हालचालींना वेग आला आहे. 

वर्षा बंगल्यावर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेसह काही अपक्ष आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सर्व आमदारांना बसमधून हॉटेलमध्ये नेण्यात आले आहे. त्यानंतर आज सायंकाळी महाविकास आघाडीमधील सर्व आमदारांची बैठक होणार आहे. मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीच्या बैठकीआधी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी अडचणीत वैगरे नाही. महाविकास आघाडीकडे बहुमत आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. 

दरम्यान, राज्यसभेच्या सहा जागेसाठी राज्यात चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत शिवसेनेने २ उमेदवार उतरवले आहेत. शिवसेना आमदारांची बैठक झाल्यानंतर आता भाजपाच्या आमदारांची ८ तारखेला बैठक होणार आहे. तर मंगळवारी काँग्रेस आमदारांचीही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला येताना बॅगा घेऊन या अशी सूचना काँग्रेसच्या आमदारांना देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात राज्यसभा निवडणुकीत प्रत्येक पक्ष आमदार फुटू नये यासाठी खबरदारी घेत आहेत. 

आमदार हितेंद्र ठाकूर यांचे पत्ते गुलदस्त्यात-

तीन आमदारांचे पाठबळ असलेल्या बहुजन विकास आघाडीची मनधरणी महाविकास आघाडीसह भाजपही करत आहे. वसई-विरारची कामे करणार, त्यालाच मते मिळणार, असे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले. 

भाजपकडून घोडेबाजार, पटोले यांचा आरोप-

भाजपने कितीही घोडेबाजार केला, केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग कितीही केला तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार राज्यसभेची निवडणूक जिंकतील. - नाना पटोले, प्रदेश अध्यक्ष, 

टॅग्स :जयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसराज्यसभामहाविकास आघाडी