देव्हाऱ्यात ठेवलेले दागिने मैत्रिणीने पळविले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 12:57 PM2023-09-24T12:57:14+5:302023-09-24T12:57:33+5:30
तक्रारदार रेखा गाला (५०) या मालाडमध्ये खजुरीया रोड क्रमांक २ परिसरात असलेल्या इमारतीत कुटुंबीयांसोबत राहतात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सोन्याचे दागिने देव्हाऱ्यात ठेवल्यावर घरात सुख-समृद्धी नांदेल असे अवघ्या चार महिन्यांपूर्वी ओळख झालेल्या महिलेने मालाड मधील एका गृहिणीला सांगितले. या महिलेचे गृहिणीने ऐकले आणि तिचे लाखभराचे दागिने घेऊन नवी मैत्रीण पसार झाली. याप्रकरणी मालाड पोलिसांनी जान्हवी सावर्डेकर (४५) हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार रेखा गाला (५०) या मालाडमध्ये खजुरीया रोड क्रमांक २ परिसरात असलेल्या इमारतीत कुटुंबीयांसोबत राहतात. त्या राहत असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर इमिटेशन दागिने बनवण्याचा कारखाना आहे. त्या ठिकाणी सावर्डेकरही काम करत होती. त्यामुळे त्यांची चांगली मैत्री झाली हाेती. या मैत्रीच्या आड सावर्डेकर हिने गाला यांना सुख-समृद्ध जीवनासाठी प्रयाेग करायला सांगितला आणि गाला यांनी आपले दागिने गमावले.
सुख-समृद्धीच्या नावाखाली चाेरीचा प्लॅन
सोन्याचे दागिने देव्हाऱ्यात ठेवत पूजा केल्यास घरात सुख-समृद्धी नांदते असे एक महाराज म्हणाल्याचे सावर्डेकरने गालांना सांगितले. गाला यांनी विश्वास ठेवत जवळपास दोन लाखांचे दागिने डब्यात भरून सावर्डेकरला देव्हाऱ्यात ठेवायला दिले. त्यानंतर ५ सप्टेंबरला गाला देव्हाऱ्यातील फुले काढायला गेल्यावर दागिन्यांच्या डब्याचे झाकण उघडे असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
तिला दागिन्यांचे विचारले असता मला याबाबत काही कल्पना नाही असे उत्तर तिने दिले. त्यानंतर ६ सप्टेंबर रोजी ती पुन्हा गाला यांच्या घरी आली आणि दागिने मिळाले का असे त्यांना विचारले.
त्यावर नाही असे म्हणत तुझ्याशिवाय माझ्या घरात दुसरे कोणी आले नसून दागिने तूच घेतले असे गाला तिला म्हणाल्या.