मुंबई : आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सामील झालो आहोत, पक्ष सोबत नाही असा काहींचा गैरसमज आहे, असे सांगत राज्यातील विविध घटकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला भांडत बसून चालणार नाही कुठे तरी सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे म्हणून हा निर्णय घेतल्याचे नवनिर्वाचित मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
मोदींवर अनेकदा टीका केली, पण देशाचे भविष्य त्यांच्या हातात सुखरूप आहे हे नाकारता येत नाही. विकासाच्या कामाबाबत ताबडतोब निर्णय घेऊन समाधान करण्याचा प्रयत्न ते करतात, असेही भुजबळ म्हणाले. ओबीसींचे अनेक प्रश्न आहेत, ते केंद्र आणि राज्य सरकार यांच्या सहकार्याशिवाय सुटणार नाहीत, असेही ते म्हणाले.
पवारांनी काही दिवसांपूर्वी आम्हाला सांगितले की, २०२४ साली मोदीच पंतप्रधान होणार आहेत. असे असेल तर सकारात्मक विचार घेऊनच काम केले पाहिजे, उगाच रस्त्यावर भांडून प्रश्न सुटणार नाहीत. शासनात जाऊन हे प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही भुजबळ यांनी सांगितले.
कोणावरही केसेस नाहीत अजित पवारांची आरोपातून मुक्तता झालेली आहे. माझ्यावर आता केस नाही, अदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांच्या कोणावरही केसेस नाहीत. हसन मुश्रीफ यांच्यावरही कोर्टाने कठोर कारवाई केलेली नाही, म्हणजे त्यांच्याविरोधात ठोस काही सापडत नाही. - छगन भुजबळ, मंत्री