Rajya Sabha Election: सहाव्या उमेदवाराचे भवितव्य अपक्ष अन् लहान पक्षांच्या हाती; घोडेबाजाराला येणार ऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 06:43 AM2022-05-31T06:43:32+5:302022-05-31T06:43:40+5:30

सहा जागांसाठी सात जण रिंगणात

The future of the sixth candidate is in the hands of independent and small parties | Rajya Sabha Election: सहाव्या उमेदवाराचे भवितव्य अपक्ष अन् लहान पक्षांच्या हाती; घोडेबाजाराला येणार ऊत

Rajya Sabha Election: सहाव्या उमेदवाराचे भवितव्य अपक्ष अन् लहान पक्षांच्या हाती; घोडेबाजाराला येणार ऊत

Next

- यदु जोशी

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत १३ अपक्ष आमदार व लहान पक्षांचे आमदार कोणाला कौल देतात यावर सहाव्या जागेचे भवितव्य अवलंबून असेल. आपल्या हक्काच्या मतांशिवाय अतिरिक्त मतांची तजवीज आम्ही केलेली आहे, असा दावा शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी केला आहे.

शिवसेनेचे संजय राऊत आणि संजय पवार, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी या सातपैकी सहा जिंकतील, एकाला घरी बसावे लागेल. भाजपने तिसरा उमेदवार देताना तो निवडून येण्याची सोय करूनच दिला असेल असे म्हटले जात आहे. अशात शिवसेनेचे दुसरे उमेदवार पवार अडचणीत येऊ शकतात. पक्षीय बलाबलाचा विचार केला तर भाजपकडे दोन जागा जिंकून सर्वाधिक अतिरिक्त मते आहेत. त्या खालोखाल शिवसेनेकडे व नंतर राष्ट्रवादीकडे अतिरिक्त मते आहेत. काँग्रेसकडे केवळ दोन अतिरिक्त मते आहेत. गोयल, डॉ. अनिल बोंडे, संजय राऊत, प्रफुल्ल पटेल आणि इम्रान प्रतापगढी यांना कोणताही धोका दिसत नाही. भाजपचे महाडिक की सेनेचे संजय पवार हा औत्सुक्याचा बिंदू आहे.

विकेट कोणाची? महाडिक, संजय पवार की आणखी कोणी?

भाजपचे दोन, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा एकेक उमेदवार  हे पहिल्या पसंतीच्या ४२ मतांचा कोटा मिळवून सहज जिंकतील.  निवडणूक गुप्त मतदानाने होत नाही. प्रत्येक पक्षाच्या आमदाराला त्याच्या पक्षाच्या प्रतिनिधीला आधी मत दाखवावे लागते आणि नंतरच ते मतपेटीत टाकावे लागते. पक्षाने ज्याला मत द्या म्हणून व्हिप जारी केलेला असतो त्याला मतदान करावे लागते आणि तसे केले नाही तर तुमची आमदारकी जाऊ शकते. मग या निवडणुकीत घोडे बाजाराला संधी आहे कुठे? तर ती आहे अपक्ष आमदारांच्याबाबत आणि लहान पक्षांबाबत. सर्व अपक्ष आमदार हे कोणत्या ना कोणत्या पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत. मात्र, आपल्या सहयोगी पक्षाच्या  प्रतिनिधीला मत दाखविण्याचे बंधन त्यांच्यावर नाही. उलटपक्षी अपक्ष आमदाराने मत दाखवू नये, असा नियम असल्याचे सांगितले जाते. इथेच घोडेबाजाराला संधी आहे. लहान पक्षांचे नेते काय निर्णय घेतात हेही महत्त्वाचे असेल.

इतर पक्ष आणि त्यांचे आमदार

बहुजन विकास आघाडी : हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, राजेश पाटील.  समाजवादी पार्टी : अबू आझमी, शेख रईस. एमआयएम : फारूख अन्वर शाह, मुफ्ती मोहम्मद इस्माईल  प्रहार जनशक्ती पक्ष : बच्चू कडू, राजकुमार पटेल  मनसे : राजू पाटील  माकप : विनोद निकोले शेकाप : श्यामसुंदर शिंदे  स्वाभिमानी पक्ष : देवेंद्र भुयार राष्ट्रीय समाज पक्ष : रत्नाकर गुट्टे   जनसुराज्य शक्ती पक्ष : विनय कोरे  क्रांतिकारी शेतकरी पक्ष : शंकरराव गडाख. (गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे.)

हे आहेत १३ अपक्ष आमदार
प्रकाश आवाडे, आशिष जयस्वाल, रवी राणा, नरेंद्र भोंडेकर, मंजुळा गावित, चंद्रकांत पाटील, विनोद अग्रवाल, किशोर जोरगेवार, गीता जैन, महेश बालदी, संजयमामा शिंदे, राजेंद्र राऊत,  राजेंद्र यड्रावकर. (यापैकी गीता जैन यांनी शिवसेनेत  प्रवेश केला होता.)

Web Title: The future of the sixth candidate is in the hands of independent and small parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.