विद्यार्थ्यांच्या कष्टातून फुलली परसबाग; विविध भाज्यांची लागवड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 03:48 PM2024-03-06T15:48:25+5:302024-03-06T15:52:41+5:30
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’अंतर्गत प्लास्टिक, तंबाखूमुक्तीवर भर.
मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमांतर्गत मुंबईतील खासगी-सरकारी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दक्षिण मुंबईतील सेंट कोलंबा शाळेने तर आपल्या विस्तीर्ण आवारात भाज्यांचा मळाच फुलवला, तर दादरची बालमोहन शाळा प्लास्टिकमुक्त, तंबाखूमुक्त ठरली.
नियमित अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती निर्माण करणे, शाळेच्या परसबागेत भाज्या लावणे, शाळेचा परिसर तंबाखू-प्लास्टिकमुक्त करणे अशा विविध उपक्रमांना ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमाने चालना मिळाल्याचे चित्र मुंबईतील खासगी-सरकारी शाळांमध्ये आहे. विविध ३० निकषांच्या कसोटीवर उतरण्यासाठी मुंबईतील जवळपास ५०० शाळांच्या व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-पालक गेले काही महिने झटत होते. त्यापैकी काही निवडक शाळांनी पुरस्कारावर मोहोर उमटवून अन्य शाळांसमोर आदर्श निर्माण केला आहे. मुंबईत केंद्रीय विद्यालयाने (आयएनएस हमला) व खासगी शाळांमध्ये मायकेल इंग्लिश स्कूलने तिसरा क्रमांक मिळवला.
दक्षिण मुंबईतील सेंट कोलंबा शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात विविध भाज्यांचा मळा फुलवला असून त्यांची मेहनत फळाला आली आहे.
मुंबई महापालिकेच्या पोयसर स्कूल (हिंदी), शिवडी क्रॉस रोड एमपीएस स्कूल यांनी या स्पर्धेत पहिला व दुसरा क्रमांक पटकावला. स्पर्धेमुळे शाळेतील अभ्यासेतर उपक्रमांना चालना मिळाली. मुख्य म्हणजे शाळांच्या उपक्रमात पालकांचा सहभाग वाढला. मुले वर्ग सजावट, स्वच्छता, किचन गार्डन, आदी उपक्रमात रस घेऊ लागली आहेत.- राजेश कंकाळ, प्राथमिक शिक्षणाधिकारी, पालिका
४५ दिवसांत मेहनत फळाला : या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावणाऱ्या गावदेवीच्या सेंट कोलंबा या मुलींच्या शाळेने प्रथमच भाज्यांची लागवड केली. परसबाग फुलवण्याचा अनुभव विद्यार्थिनींना नवा होता. भाज्यांचा वापर शाळेच्या किचनमध्ये मिड-डे मिलसाठी केला, असे शाळेच्या मुख्याध्यापिका शुभदा केदारी यांनी सांगितले. अवघ्या ४५ दिवसांत शाळेने ही शेती फुलवली.
उपक्रमांमध्ये भर : स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या दादरच्या बालमोहन शाळेला तर केंद्र सरकारनेच ‘मनी स्मार्ट स्कूल’ घोषित केले आहे. शाळेच्या या लौकिकात या पुरस्काराने भर घातली आहे. शाळेत सर्व विद्यार्थ्यांचा वाढदिवस, मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी बालदिन म्हणून एकत्रित साजरा केला जातो. याशिवाय ऋतुनुसार बदलणारे सांस्कृतिक जीवन व खानपानाचे संस्कार शाळेत केले जातात. शाळेत नियमितपणे विविध विषयांवरील तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन विद्यार्थी-पालकांकरिता केले जाते. स्पर्धेच्या निमित्ताने शाळेच्या उपक्रमात आणखी भर पडली, असे शाळेचे शिक्षक विलास परब यांनी सांगितले.