Join us  

गेट बंद केले, आम्ही आता जायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2023 11:58 AM

घाटकोपर पूर्व येथील एमपी वैद्य मार्गाजवळच अन्नपूर्णा इंडस्ट्रिअल सोसायटी असून येथे ८० पेक्षा जास्त गाळेधारक वर्षानुवर्षे व्यवसाय करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोणतीही नोटीस न देता पालिकेने घाटकोपर पूर्व येथील अन्नपूर्णा इंडस्ट्रिअलचे रहदारी असलेले गेट बंद केल्याचा प्रकार उघड झाला आहे. गेट बंद केल्यामुळे या ठिकाणी कामावर येणाऱ्या नागरिकांची अडवणूक होत असून, व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे. इतकेच नव्हे तर गेटसमोरील पदपथावर फूड स्टॉल ठेवण्यात आला आहे. पालिकेने हा स्टॉल तातडीने काढून टाकावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अन्नपूर्णा इंडस्ट्रिअलच्या व्यापाऱ्यांनी पालिकेला दिला आहे.

घाटकोपर पूर्व येथील एमपी वैद्य मार्गाजवळच अन्नपूर्णा इंडस्ट्रिअल सोसायटी असून येथे ८० पेक्षा जास्त गाळेधारक वर्षानुवर्षे व्यवसाय करीत आहेत. स्थानिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता इंडस्ट्रिअलच्या गेटवर पालिकेने पत्रे लावून गेट बंद केले आहे. तसेच या ठिकाणी एक फूड स्टॉल आणला आहे. गेट बंद झाल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांचीही अडवणूक होत असून येथे उभारण्यात आलेल्या स्टॉलमुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होणार आहे.  हा गेट खुला करण्यात यावा; तसेच स्टॉल हटविण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आयुक्त, सहायक आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे, अशी माहिती सोसायटीकडून देण्यात आली.

स्टॉप वर्क नोटीस  ‘एन’ वॉर्डचे सहायक आयुक्त संजय सोनावणे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, अडीच महिन्यांपूर्वी संबंधित सोसायटीने बेकायदा गेट सुरू केले आहे.   या गेटचे काम सुरू असतानाच पालिकेकडून अन्नपूर्णा सोसायटीला ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावण्यात आली होती.   त्यामुळे पालिकेने केलेली कार्यवाही योग्यच आहे.