Join us

गॅझेटीअरला आता जागतिक मानांकन; अचूक संदर्भ मिळविणे सोपे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 1:15 PM

जगभरातील वाचकांना सहज उपलब्ध होणार, अचूक संदर्भ मिळविणे सोपे

स्नेहा मोरे

मुंबई : राज्य शासनाच्या दर्शनिका (गॅझेटीअर) विभागाकडून अनेक विषयांवर दर्शनिका प्रकाशित करण्यात येतात. मात्र, बऱ्याचदा  वाचक, अभ्यासक, संशोधकापर्यंत पोहोचण्यास असमर्थ ठरतात. त्यावर तोडगा काढत आता राज्य शासनाच्या गॅझेटीअरला जागतिक मानांकन देण्यात आले आहे. त्यामुळे आता विभागाच्या सर्व गॅझेटीअरर्सना इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर हा विशेष क्रमांक प्राप्त होणार आहे. या माध्यमातून जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून वाचकांसाठी गॅझेटीअर उपलब्ध होणार आहे.

दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक डॉ. दिलीप बलसेकर यांनी सांगितले की, दर्शनिका विभागाने काळानुरूप कात टाकण्यासाठी तंत्रज्ञानातील सर्व बदल स्वीकारले आहेत. त्या त्या कालावधीत तंत्रज्ञान स्वीकारून ई- बुक्स, पेन ड्राइव्ह आणि दृकश्राव्य माध्यमातही आता विभाग काम करत आहे. त्या अनुषंगाने एवढ्या मोठ्या स्वरूपातील गॅझेटीअर्सचे काम जगभरातील वाचकांना एका क्लिकवर उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू होते.

इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर  

आंतरराष्ट्रीय प्रमाणित पुस्तक क्रमांक (इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर)  ही पुस्तकाची ओळख असते. एखादे पुस्तक ओळखण्यासाठी त्याला विशेष- व्यावसायिक अंकीय क्रमांक महत्त्वाचा ठरतो. या क्रमांकाद्वारे जगातल्या जवळपास कोणत्याही पुस्तकाचा शोध घेतला जाऊ शकतो व त्याबद्दल माहिती मिळवली जाऊ शकते. सुरुवातीला ही पद्धत फक्त अमेरिका, युरोप आणि जपानमध्ये प्रचलित होती; परंतु, आता सर्व जगभरात याचा वापर केला जातो. 

गॅझेटीअर हे विद्यार्थी, पीएचडी शाखेतील विद्यार्थी, संशोधकांसाठी दिशादर्शक ठरतात. कारण गॅझेटीअरर्समध्ये एखादा विषय वा घटना यांचे अचूक संदर्भ आणि सविस्तर माहिती आढळते. 

टॅग्स :मुंबई