Join us

ब्लास्टिंगमुळे फुटल्या मंत्रालयाच्या काचा, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांचेही नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 6:25 AM

मंत्रालयाच्या काचा तर फुटल्याच; पण पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांचेही नुकसान झाले. 

मुंबई : मुंबई मंत्रालय उडवून देण्याच्या धमकीच्या फोनमुळे मंत्रालयात गुरुवारी खळबळ उडालेली असतानाच मंत्रालयाशेजारी मेट्रोचे काम सुरू आहे, त्याच्या ब्लास्टिंगमुळे उडालेले दगड मंत्रालयाच्या इमारतीवर  धडकले. यामुळे मंत्रालयाच्या काचा तर फुटल्याच; पण पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांचेही नुकसान झाले. 

दोनच दिवसांपूर्वी अपर वर्धा धरणग्रस्तांनी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील संरक्षक जाळ्यांवर उड्या मारून आंदोलन केले होते. त्यामुळे पोलिस यंत्रणेची तारांबळ उडाली होती. मंत्रालयाच्या बाजूलाच मेट्रोचे काम सुरू आहे. या ठिकाणी ब्लास्टिंग सुरू होते. या ब्लास्टिंगच्या वेळी मोठे दगड उडून मंत्रालयात येऊन पडले.

मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने सांगितले की, सध्या आम्ही मंत्रालयाजवळील भुयारी मार्गावर नियंत्रित ब्लास्टिंगचे काम थांबवले असून, या कामाचा आढावा घेतला जाईल. ब्लास्टिंगदरम्यान झालेल्या घटनेच्या कारणांचा अभ्यास करून सुधारणेनंतरच काम पुन्हा सुरू केले जाईल.

चाकू घेऊन मंत्रालयात जाण्याचा प्रयत्न मंत्रालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत वैयक्तिक कामासाठी आलेल्या कुकच्या बॅगेत चाकू आढळून आल्याने गुरुवारी खळबळ उडाली. पोलिसांनी २९ वर्षीय  तरुणाला ताब्यात घेत अधिक तपास सुरू आहे. मंत्रालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत दुपारच्या सुमारास एक तरुण आतमध्ये आला. स्कॅनिंगदरम्यान त्याच्या बॅगेत चाकू आढळल्याने त्याला सुरक्षा रक्षकांनी गेटवरच अडवले. त्याच्याकडे याबाबत चौकशी केली. मात्र, समाधानकारक उत्तर न  मिळाल्याने त्याला मरिन ड्राइव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याचे  मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश बागुल यांनी सांगितले.

टॅग्स :मंत्रालय