मराठी संगीत रंगभूमीचे वैभव उलगडणार, शतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त विशेष दर्शनिका
By स्नेहा मोरे | Published: November 5, 2023 07:16 AM2023-11-05T07:16:53+5:302023-11-05T07:17:25+5:30
मराठी संगीत रंगभूमीच्या शतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त ही विशेष दर्शनिका प्रकाशित करण्यात येणार आहे.
मुंबई : ‘मराठी संगीत रंगभूमीचा १७५ वर्षांचा इतिहास’ या विषयावर तीन खंडामधील स्वतंत्र राज्य दर्शनिका (गॅझेटीअर) लवकरच वाचकांच्या भेटीस येणार आहे. या खंडांच्या माध्यमातून नव्या, जुन्या पिढीसाठी पुन्हा एकदा मराठी संगीत रंगभूमीचे वैभव उलगडणार आहे. मराठी संगीत रंगभूमीच्या शतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त ही विशेष दर्शनिका प्रकाशित करण्यात येणार आहे.
दीड शतकांहून अधिक काळ कलारसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या मराठी संगीत रंगभूमीबाबत एकत्रित कुठेही लिहिले गेलेले नाही. या दर्शनिकेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या वैभवशाली संगीतनाट्य परंपरेचे जतन आणि संवर्धन व्हावे या उद्देशाने संगीत रंगभूमीवरच्या देदीप्यमान पर्वाच्या स्मृतींना जागृत करीत आजच्या पिढीला प्रेरणा मिळावी, योग्य दिशा मिळावी यासाठी हा साहित्य ठेवा दिशादर्शक ठरणार आहे.
सांस्कृतिक विभागाने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार, मराठी संगीत रंगभूमी-शब्दस्वर लेण्यांची संगीतनाट्य गौरवगाथा खंड १ पूर्वरंग प्रकाशन सोहळा आयोजित करण्यासाठी नुकतेच ३१ लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.
तज्ज्ञ कलावंतांचा सहयोग
सुरुवातीच्या टप्प्यात दर्शनिका विभागाकडून ‘मराठी संगीत रंगभूमी : पूर्वरंग भाग एक’ हा खंड प्रकाशित करण्यात येणार आहे. या दर्शनिकेच्या मुख्य लेखिका व समन्वयक डॉ. वंदना घांगुर्डे आहेत. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, गायिका, अभिनेते, अभिनेत्री, संगीत रंगभूमीचे अभ्यासक, संशोधक अशा अनेक तज्ज्ञ कलावंतांच्या सहयोगाने हा खंड पूर्ण करण्यात आला आहे.
असे असतील खंड
पहिल्या खंडामध्ये ५ नोव्हेंबर १८४३ ते १९३२ , पूर्वरंगांत इ.स.५ नोव्हेंबर १८४३-१९१० आणि उत्तररंगात १९११ ते १९३२ काळातील संगीत रंगभूमीचे लेखन केले आहे. दुसऱ्या खंडात १९३३ ते १९५९ , तिसऱ्या खंडात साठोत्तर रंगभूमीच्या लेखनाचा समावेश आहे, यात १९६० ते २०२० च्या काळाचा समावेश आहे.
दर्शनिकेत काय?
दर्शनिकेत नाटकाचे कथानक स्वरूप व त्याचे वाङ्मयीन मूल्य, नाटकाचे संगीत नाटककार, कवी संगीतकार, नाटक कंपन्या, नटगवई आणि गद्य कलाकार यांचे योगदान सामाजिक परिस्थिती, नाटकामुळे झालेले संस्कृतीचे जतन-संवर्धन व परंपरा अशा सर्वांगाने लेखन केले आहे.
- डॉ. दिलीप बलसेकर,
दार्शनिक विभागाचे कार्यकारी संपादक