- श्रीकांत जाधव लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ब्रिटिशांनी पावणेदोनशे वर्षापूर्वी मुंबईत मैलाचे दगड लावले आहेत. त्यापैकी एक दगड परळ येथील एस. एस. राव मार्ग फूटपाथ आहे. हा दगड जुन्या मुंबईचे वैभव दाखविणारा असल्याने त्याचे जतन आणि संरक्षण करणे गरजेचे आहे. मात्र, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे या दगडाचे दोन तुकडे झाले आहेत. त्यातील एक तुकडा बुधवारी येथून नाहीसा झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पालिकेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
ब्रिटिशांनी १८३६ मध्ये दगड लावलेमुंबई बेटावर अंतर माहीत असावे म्हणून ब्रिटिशांनी अशा प्रकारचे मैलाचे १७ दगड मुंबई बेटावर १८३७ च्या दरम्यान ठेवले आहेत. कुलाबा ते माहीमपर्यंत अशा प्रकारचे मैलाचे दगड आहेत. यातील काळा घोडा येथील सेंट थॅामस चर्चजवळ एक दगड आहे. ब्रिटिशांनी क्रमांकानुसार हे दगड ठेवले आहेत. शेवटचा दगड माहीम कॉजवे व सायन किल्ला येथे आहे.
परळमध्ये पाच क्रमांकाचा दगड ! पालिकेकडून पदपथावरील अतिक्रमण हटविताना परळ येथील एस. एस. राव मार्ग पदपथावर जमिनीत साडेचार फूट उंचीचा मैलाचा दगड सापडला होता. हा बॅसॉल्ट खडक असून तो पाच क्रमांकाचा दगड आहे. पालिकेकडून या दगडाचे जतन केले जाणार होते.
हेरिटेज क्रमांक १ मध्ये पुरातन वास्तूंचे जतन केल्यानंतर त्याची योग्यरित्या काळजी घेणे गरजेचे आहे. पण पुरातत्व आणि पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे परळच्या मैलाच्या पाचव्या दगडाची दुरवस्था झाली. दगडाचे दोन तुकडे झाले आहेत. पालिकेने लावलेली क्यूआर कोड नेमप्लेटही गायब झाली आहे. सर्वत्र घाण आणि अस्वच्छता आहे. त्यामुळे मुंबईचा जुन्या इतिहासाची वैभवस्थळे नष्ट होत आहेत.- मिलिंद आरोलकर, ज्येष्ठ पत्रलेखक, परळ