Join us  

रोषणाईचा झगमगाट काही दिवसांचाच! पावसाने उडवली सार्वजनिक ठिकाणांची रंगरंगाटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 11:38 AM

मुंबईचे असेही सुशोभीकरण

रतिंद्र नाईकलोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : महापालिकेने सुशोभिकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्चून मुंबईचा कायापालट केला. कुठे रंगरंगोटी तर, कुठे काँक्रिटीकरण केले असले तरी या कामांचा बट्ट्याबोळ झालेला पाहायला मिळतो. रस्त्याच्या दुतर्फा केलेली आकर्षक विद्युत रोषणाई आता अखेरची घटका मोजताना पाहायला मिळते तर, सार्वजनिक ठिकाणी केलेली रंगरंगोटी पावसामुळे उडताना दिसत आहे.

सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत मुंबईतील रस्त्यालगतच्या विद्युत खांबांवर पालिकेने विविध आकारांमध्ये एलईडी दिवे लावले आहेत. रात्रीच्या वेळेस विद्युत रोषणाईच्या झगमगाटामुळे डोळे दीपून जातात. मात्र, मुंबईकरांना या विद्युत रोषणाईचा काही दिवसांपुरताच झगमगाट पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी एलईडी दिवे बंद पडले असून, काही ठिकाणी नादुरुस्त अवस्थेत आहेत.

पुलाची रंगरंगोटी अपुरीच

सुशोभिकरणांतर्गत पुलाची तसेच सार्वजनिक भिंतींची रंगरंगोटी पालिका प्रशासनाने केली. काही ठिकाणी पुलाचे केवळ खांबच रंगवण्यात आले आहेत तर, पुलाचा उर्वरित भाग तसाच ठेवला आहे. इतकेच नव्हे तर पहिल्या पावसातच ही रंगरंगोटी फिकी पडली. काही ठिकाणी रंगरंगोटी केलेल्या खांबांवर चित्रे काढली आहेत. भित्तीपत्रके चिकटवण्यात आली आहेत.

झाडांना खिळे 

सुशोभिकरणांतर्गत मुंबईतील झाडांवर विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. त्यासाठी या झाडांवर एलईडी दिव्यांची तोरणे लावण्यात आली. मात्र, ही तोरणे लावण्यासाठी झाडांवर असंख्य खिळे ठोकले आहेत. 

`जी-२०`च्या पाहुण्यांवर छाप 

मुंबईमध्ये जी-२० शिखर परिषद तीन वेळा झाली. याला विविध देशांतून प्रतिनिधी आले होते. त्या पाहुण्यांवर छाप पाडण्यासाठी पालिकेने कोणतीही कसूर ठेवली नाही. प्रशासनाकडून प्रमुख रस्ते, तसेच द्रुतगती महामार्गांवरील झाडांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर परदेशी पाहुण्यांना मुंबईतील झोपडपट्टीचे दर्शन होऊ नये यासाठी ती झाकोळण्यात आली होती.