सोन्याच्या विटाही गेल्या अन् पैसेही, व्यावसायिकाची सव्वा दोन कोटींना फसवणूक
By मनीषा म्हात्रे | Published: November 5, 2023 05:27 PM2023-11-05T17:27:45+5:302023-11-05T17:28:06+5:30
बुलियन मार्केटमधील व्यावसायिकाला स्वस्तात सोन्याच्या विटा भलत्याच महागात पडल्या आहेत.
मुंबई : बुलियन मार्केटमधील व्यावसायिकाला स्वस्तात सोन्याच्या विटा भलत्याच महागात पडल्या आहेत. सोन्याच्या विटांचा वितरक असल्याची बतावणी करत ठगाने व्यावसायिकाला स्वस्तात सोने देण्याचे आमीष दाखवून दोन कोटी ४० लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी अरुणकुमार शर्मा नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
चेंबूर परिसरात राहणारे २४ वर्षीय तक्रारदार हे बुलियन मार्केट व्यावसायिक आहेत. यातील आरोपी शर्मा याने त्यांना तो सोन्याच्या विटांचा वितरक असून आठ किलो वजनाच्या सोन्याच्या विटा बाजारभावापेक्षा कमी दराने देण्याचे आमिष दाखविले. सोन्याच्या विटांच्या मोहात व्यावसायिकाने चार कोटी ८० लाख रुपये गुंतवले. मात्र शर्मा हा सोन्याच्या विटा देण्यास टाळाटाळ करु लागला.
तक्रारदार व्यावसायिकाने पैसे परत करण्याचा तगादा लावताच, शर्माने दोन कोटी ४० लाख रुपये परत केले. मात्र उरलेले दोन कोटी ४० लाख रुपये दिले नाहीत. ३१ आॅगस्ट ते ३ नोव्हेंबर दरम्यान हा प्रकार घडला. अखेर आपली फसवणूक झाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी शनिवारी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.