Join us

सोने कारागिराला बोलण्यात गुंतवून लुटले; बोलबच्चन गॅंगमधील दोघांना अटक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 13:01 IST

आपण ज्याच्याशी बोलत होतो, तो गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर    कारागिराने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. 

मुंबई : अंधेरी येथील एका २२ वर्षीय सोने कारागिराला झवेरी बाजारात एकाने बहाणा करत आधी थांबवले... नंतर दुसरा आला, ‘कोणावर विश्वास ठेवू नको’, असे सांगत बोलण्यात गुंतवून ठेवले. मग हळूच हातातील बॅग काढून घेतली. या बॅगेत २२५ ग्रॅम सोने होते. त्यानंतर दोघे गर्दीतून गायब झाले. आपण ज्याच्याशी बोलत होतो, तो गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर  कारागिराने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. 

अंधेरीत ज्वेलर्सच्या दुकानातील कारागीर हे झवेरी बाजारातील सोने व्यापाऱ्याच्या  ऑर्डरप्रमाणे दागिने कच्च्या सोन्याची लगड घेऊन निघाले. याचदरम्यान एका अनोळखी व्यक्तीने त्यांना  थांबवले. ‘मै योध्यानगर से आया हूं! मैने आपको रोक के कोई परेशान तो नही किया?’, अशी विचारणा करत त्याने या सोने  कारागिराकडे एक रुपयाची मागणी करत प्रसाद खरेदी करून आणण्यास सांगितले. त्याचवेळी दुसऱ्या व्यक्तीने  सोने कारागिराला एका कोपऱ्यात नेत अशा व्यक्तींवर विश्वास ठेवू नका, असे सांगत त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. संधी साधत बॅग घेऊन पोबारा केला.

सोने घेऊन फरार झालेले अल्ताफ फकीर मोहम्मद हुसेन (४०), जाबीर अली तालीब हुसेन (३८) यांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने दोघांना १४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याविरुद्ध पायधुनी, लोटीमार्गासह मध्यप्रदेश, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद, कोलकातामध्ये गुन्हे दाखल आहेत. 

पायधुनी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त ज्योत्स्ना रासम, लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्याचे वपोनि ज्ञानेश्वर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुशीलकुमार वंजारी यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासत मध्यप्रदेशातून त्यांना एका दर्ग्यातून ताब्यात घेतले. ते रतलमचे रहिवासी असल्याचे समजले. ते अगरबत्ती गँग आणि बोलबच्चन गँग या नावाने ओळखले जातात. दोघेही अजमेरमध्ये मोहरम साजरा करण्यासाठी गेले होते. 

टॅग्स :गुन्हेगारीपोलिस